आता रात्रीचं आकाशच होणार गायब; मृग नक्षत्र, सप्तर्षी अन् असंख्य तारे दिसणार नाहीत; कारण…

आकाशातील मृग नक्षत्र, सप्तर्षी पाहून आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आजही गावी गेलो की छतावर झोपलो की तारे मोजण्याची सवय काय जात नाही. परंतु येणाऱ्या पिढीला हा अनुभव मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण काही वर्षांनी रात्रीचे आकाशच आपल्याला दिसायचे बंद होणार आहे. शास्त्रज्ञांनी यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

सन 2011 ते 2022 या कालावधीमध्ये रात्रीच्या आकाशाची चमक सात ते दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. जमिनीवर प्रकाश देणारे मानवनिर्मित दिवे आकाशाला धुसर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यामागे प्रदुषण हे देखील कारण असून संपूर्ण जग प्रकाशमय करण्याच्या नादात आपण भविष्यकाळात आकाशातील ताऱ्यांचा नजारा पाहणे गमावणार आहोत.

पृथ्वीवर सतत वाढत असलेल्या प्रकाश आणि प्रदुषणामुळे माणसाचे डोळे आणि आकाश यांच्यातील प्रकाशाचे परावर्तन खुप जास्त होत आहे. त्यामुळे डोळ्यांना अंधुक दिसत असून तारे दिसेनासे झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

संशोधकांनी उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांना रात्रीचे आकाश स्पष्ट दिसते का? असा सवाल केला. गेल्या दशकभरात यात किती बदल झाला? असेही लोकांना विचारण्यात आले. याला लोकांनी दिलेल्या उत्तरानंतर संशोधकांनी प्रकाश प्रदुषणाचा अहवाल तयार केला. यात गेल्या दशकात प्रकाश प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात आले असून त्यामुळे रात्रीचे आकाश दिसणे सात ते दहा टक्क्यांनी कमी झाले आहे.

सध्या प्रकाश प्रदुषण कमी असलेल्या ठिकाणांवरून (गाव किंवा ग्रामीण भाग) जे तारे दिसतात तेच तारे तुम्हाला शहरातून मात्र दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. खरे तर ते तारे तिथेच असतात परंतु खराब हवा आणि प्रकाश प्रदुषणामुळे तारे दिसत नाहीत.