
मुंबईत जी-20 परिषदेसाठी आलेल्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रतिनिधींनी आज बेस्टच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. संपूर्ण परिषदेदरम्यान कार्यगटाच्या प्रतिनिधींसाठी मुंबईत वाहतुकीची व्यवस्था बेस्टने केली आहे. कार्यगटाच्या प्रतिनिधींनी बेस्टला पसंती देऊन देशातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याची पोचपावतीच बेस्ट उपक्रमाला दिली आहे. बेस्टसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान समजला जात आहे.
मुंबईत आजपासून सुरू झालेल्या जी-20 परिषदेच्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रतिनिधींच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचा मान आणि संधी बेस्ट उपक्रमाला मिळाली आहे. त्यामुळे उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेला बेस्ट उपक्रम असा संदेश जागतिक पातळीवर गेला आहे. येत्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाकडे 464 इलेक्ट्रिक बस ताफा उपलब्ध होणार असून सध्या 56 इलेक्ट्रिक प्रीमियम बस बेस्टकडे आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत उपक्रमाला आणखी 50 टक्के इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार असून 2026 पर्यंत यात वाढ केली जाणार असून 464 चा पूर्ण ताफा बेस्टकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची वर्षाला सहा मिलियन इंधनाची बचत होणार असून पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱया 6.5 मिलियन टन कार्बनडाय ऑक्साईडपासून मुक्ती मिळणार आहे.
इतक्या मोठय़ा संख्येने पर्यावरणाला आणि सर्वसामान्यांना पोहोचणारी हानी टाळता येणार आहे. या माध्यमातून बेस्ट पुढील 10 वर्षांत कार्बन क्रेडिटच्या सहाय्याने अंदाजे 500 कोटींचा महसूल मिळवू शकेल. त्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
हा बेस्टचा बहुमान
मुंबईत आजपासून सुरू झालेल्या जी-20 परिषदेच्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रवासाची व्यवस्था बेस्ट उपक्रमावर सोपवण्यात आली आहे. बेस्टबरोबर ही प्रवास व्यवस्था पुरवण्याचा अधिकृत करार करण्यात आला आहे. अशा प्रकारे एका जागतिक परिषदेच्या शिष्टमंडळाला, प्रतिनिधींच्या प्रवासासाठी एका सार्वजनिक वाहतूक उपक्रमाला पसंती देण्याचा हा मोठा बहुमान आहे, अशी प्रतिक्रिया लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, ऍपबेस सेवा असलेल्या बेस्ट लक्झरी बसेसच्या सेवेला मुंबईकरांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.