निवडणुकांवर नक्षवाद्यांची दहशत, बहिष्कारचे बॅनर झळकले

37
फाईल फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक दोन टप्प्यात होणार असून १६ व २१ फेब्रुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत नक्षलवाद्यांतर्फे निवडणुकीसंदर्भात बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरबाजीतून निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करतानाच सुरजागडच्या लोहप्रकल्पाच्या मुद्दयावरून पालकमंत्री अम्ब्रीश आत्राम यांच्यावर नक्षलवाद्यांनी बॅनर लावून तीव्र शब्दात टिका केलेली आहे.

हे बॅनर एटापल्ली व नंतर राजाराम खांदला आणि रायगट्टा भागात नक्षलवाद्यांनी लावलेले आहेत. २३ डिसेंबरला नक्षलवाद्यांनी गडचिरालीच्या एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या कच्चा माल घेऊन जाणाऱ्या ७६ ट्रक आणि ३ फोकलँड, १ बाईक पेटवल्या होत्या. एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोहप्रकल्प बंद पाडला. आता गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व लोह प्रकल्पाबाबत नक्षल बॅनर लावण्यात आले आहे. निवडणुकीत बहिष्कार टाकण्याबाबत व पालकमंत्री यांच्यावर तीव्र शब्दात टिका करण्यात आलेली आहे. यामुळे एटापल्ली, अहेरी, भामरागड तालुक्यात मोठया प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्चा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांची नामांकन अर्जाची मुदतही संपुष्टात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर एटापल्ली, भामरागड, अहेरी तालुक्यातील जि. प. व पं. समितीकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये मोठया प्रमाणावर कुजबुज सुरू झालेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या