मुलीने पळून लग्न केल्याने आई, वडील, भावाची आत्महत्या

1176

मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे धक्का बसलेल्या आई-वडिलांसह मुलीच्या भावाने आत्महत्या केली. गडचिरोलीतील आनंद नगर येथे सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. रविंद्र वरगंटीवार (52), वैशाली वरगंटीवार (46) आणि साहिल वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपली मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा जबर मानसिक धक्का बसल्याने आई-वडील आणि भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास तिघांचे मृतदेह विहीरीत तरंगताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे कुटुंब मूळचे अमिर्झा या गावातील असून काही वर्षांपासून गडचिरोलीतील आनंदनगर येथे भाडय़ाने राहात होते.

कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका असलेल्या मुलीने आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना घरी दीड महिन्यापूर्वी दिली होती, पण तिच्या लग्नाला घरातून विरोध होता. त्यामुळे शनिवारी ती घरातून निघून गेली. याचा जबर मानसिक धक्का वरगंटीवार कुटुंबीयांना बसला. त्यातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. घराच्या मागील बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत तिघांनी उडी घेतली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या