सुफलनाची आणि समृद्धीची देवता

1138

>> डॉ. मंजिरी भालेराव

अनेक धर्म-संप्रदायांचा उगम होताना देवदेवतांच्या निर्मितीपासून भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया दैवतांपैकी सर्वात लोकप्रिय देवता म्हणजे गजलक्ष्मी.

हिंदुस्थानी उपखंडात अनेक धर्म-संप्रदायांचा उगम आणि विकास झाला. त्यासाठी अनेक देवदेवतांची निर्मिती झाली. त्यातही काहीं देवतांनी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन भक्तांच्या मनावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवले, पण काळाच्या प्रवाहात भक्तांसारखेच या देवतांच्याही लोकप्रियतेत आणि आयुष्यात चढ-उतार झाले. काही देवतांची लोकप्रियता कमी होऊन त्या एकतर या काळाच्या पडद्यामागे गेल्या किंवा अगदी गौण स्थानावर आपले अस्तित्व टिकवून राहिल्या, पण काही देवता मात्र अगदी प्राचीन काळापासून आपले भक्तांच्या हृदयातील स्थान टिकवून आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे ‘गजलक्ष्मी’.

उमललेल्या कमळावर आरूढ झालेल्या या दोन किंवा चार हात असलेल्या देवीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा चार हत्ती सोंडेत कलश घेऊन उभे असतात. ते आपल्या सोंडेतल्या त्या कलशातील पाण्याने देवीला अभिषेक करत असतात. अशा प्रकारचे रूप असलेली ही देवता अगदी प्राचीन काळापासून हिंदुस्थानात अतिशय महत्त्वाची आहे. श्रीसूक्तामध्ये वर्णन केलेली आधी सृजनाचे आणि त्यामुळे आलेल्या समृद्धीचे प्रतीक असलेली ही देवता आहे. वैदिक आणि पौराणिक हिंदू परंपरेत तिला अपरंपार महत्त्व असल्याचे आपल्याला दिसते, पण वेदप्रामाण्य न मानणाऱया जैन आणि बौद्ध परंपरांमधेही या देवतेला खूप महत्त्व दिलेले दिसते. प्राचीन हिंदुस्थानी कलेत गजलक्ष्मीचे अंकन हे दोन हजार वर्षांपूर्वीपासून पाहायला मिळते. इ.स. पूर्व दुसऱया शतकातील मध्य प्रदेशातील भारहूत येथील स्तुपावर या देवतेचे अंकन दोन ते तीन वेळा पाहायला मिळते. इथेही एका कुंभातून निघालेल्या कमळाच्या फुलांवर देवी कधी उभी तर कधी बसलेली दाखवली आहे. तिच्या दोन्ही बाजूला हत्ती सोंडेत कलश घेऊन उभे दाखवले आहेत. त्या कलशातील पाण्याने ते देवीवर अभिषेक करत आहेत. यामध्ये मुळातच कुंभ हे सृजनतेचे म्हणजे खरे तर स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे. यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेमध्ये असा उल्लेख येतो. त्यामुळे ज्या समृद्धीची निर्मिती व्हायची आहे ती कुंभातूनच होणार या कल्पनेतून हे कमळाचे देठ कुंभातूनच आलेले दाखवले आहेत. कमळसुद्धा पावित्र्याचे आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. हत्तीही त्यांच्या सोंडेत धरलेल्या कुंभातून पाण्याचा अभिषेक करताना दाखवले आहेत. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी विद्यातज्ञ कै. रा. चिं. ढेरे यांनी सुचवले आहे की, या देवतेच्या शिल्पाची मूळ संकल्पना ही पृथ्वीमातेवर हत्तीरूपी ढगांनी करायचा पर्जन्याचा अभिषेक ही आहे. त्यामुळे इथे लक्ष्मी ही देवता न मानता खरे तर पृथ्वीमाता आणि तिच्यावर होणारा पर्ज्यन्याचा वर्षाव हीच संकल्पना यामागे आहे. त्यामुळे आदिम कालापासून या रूपकाचे पूजन होत आहे. पावसामुळे जशी संपूर्ण धरती धनधान्याने समृद्ध होते तशी समृद्धी (धान्याची आणि मुलाबाळांची) आम्हाला मिळो अशा विचारांनी या शिल्पाची निर्मिती झाली असावी. त्यामुळे सर्व जाती आणि धर्माच्या कक्षा ओलांडून या देवतेची उपासना सर्व लोक करत असत असे दिसून येते. या देवतेची उपासना म्हणजे सृजनता, सुफलन आणि त्यातून येणारी समृद्धी यासाठी करायची आराधना. या गोष्टी जगातील सर्व जीवांना हव्या असतात मग ते कोणत्याही धर्माचे का असेनात. त्यामुळे हिंदुस्थानच्या भूभागात निर्माण झालेल्या सर्वधर्मीय लोकांसाठी गजलक्ष्मी ही सृजनतेची देवता होती. त्यामुळे तिची उपासना मोठय़ा प्रमाणावर होत असणार हे उपलब्ध पुराव्यांवरून लक्षात येते.

हिंदुस्थानात दगडातील कलेचा सर्वात प्राचीन पुरावा हा मौर्य काळापासून मिळतो. इ.स.पूर्व दुसऱया शतकात निर्माण झालेले स्तूप आणि त्यावरच्या कलेत गजलक्ष्मी ही देवता ठळकपणाने दिसतेच, पण त्याच काळातील हिंदुस्थानच्या वायव्य भागात राज्य करणाऱया अझिलायझेस या शक राजानेसुद्धा गजलक्ष्मीचे चित्र असलेले नाणे पाडले होते. इ.स.पूर्व पहिल्या शतकातील सातवाहन राजा सिरी सातकर्णी याच्याही नाण्यावर गजलक्ष्मीचे अंकन दिसते. सातवाहनांच्या राज्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या जुन्नर येथील मानमोडी डोंगरातील भूतलेणी (बुद्धलेणीचा अपभ्रंश) समूहातील चैत्यगृहाच्या मुखदर्शनावर गजलक्ष्मीचे शिल्पांकन केलेले दिसते. त्याबरोबरच संभाजीनगरजवळील पितळखोरा, सुधागडजवळील ठाणाळे (नाडसूर), त्याचप्रमाणे सांची येथील स्तुपावरही अनेक तोरणांवर गजलक्ष्मीचे शिल्प पाहायला मिळते. बौद्ध धर्माच्या या महत्त्वाच्या स्थळांवर गजलक्ष्मीचे शिल्पांकन त्या धर्मातील स्थान स्पष्टपणे दर्शवते.
जैन धर्मीयांसाठीही गजलक्ष्मी अतिशय महत्त्वाची देवता आहे. कारण शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या आईने म्हणजे राणी त्रिशलेने त्यांच्या जन्माआधी जी शुभस्वप्ने पाहिली त्यामधले एक म्हणजे या गजलक्ष्मीचे. त्यामुळे जैन धर्मीय वास्तूंवरही आपल्याला या देवतेचे प्राचीन काळापासून शिल्पांकन आढळते. ओडिशामधील उदयगिरी-खंडगिरी येथील गुंफांमध्येही गजलक्ष्मीचे शिल्प ठळकपणे दिसून येते. पुढे इ.स.च्या आठव्या शतकानंतर बांधलेल्या जैन मंदिरांमधेही गजलक्ष्मीच्या अनेक मूर्ती आढळतात. त्यामुळे जैन धर्मातही गजलक्ष्मी या देवतेचे महत्त्वाचे स्थान होते हे स्पष्टपणे दिसून येते.
हिंदू धर्मात तर वैदिक काळापासून या देवतेचे पूजन अखंड सुरू आहे. श्रीसूक्तात हस्तीनाद – प्रबोधिनी म्हणजे हत्तीच्या आवाजाने जागी होणारी असा तिचा उल्लेख आला आहे. गजलक्ष्मी किंवा गजान्तलक्ष्मी या नावाने तिची पूजा आजही सर्व घरांमधून होते. विशेषतः दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची पूजा हमखास केली जाते, पण या पूजेचे पुरावे अगदी प्राचीन काळापासून आपणास मिळाले आहेत. प्राचीन वस्तीच्या ठिकाणी झालेल्या उत्खननात तर हिच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती सापडतातच, पण गुंफा आणि मंदिरे येथेही तिचे मोठय़ा प्रमाणावर शिल्पांकन झालेले दिसते. जगप्रसिद्ध वेरूळच्या कैलास लेण्यांत प्रवेश करताना समोरच या देवतेचे प्रचंड मोठे शिल्प दिसते. तिला नमस्कार करून मगच मंदिरात प्रवेश करायचा हे यातून स्पष्ट होते. या शिल्पाशेजारी एक छोटासा शिलालेख आहे. त्यामध्ये तिला ‘जलक्रीडालक्ष्मी’ आणि शेजारच्या हत्तींना ‘उदधीचंड’ असे म्हटले आहे.

‘मानसार’ या वास्तुशास्त्र्ाविषयक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की, वास्तूच्या चौकात दरवाजापाशी गजलक्ष्मीचे शिल्प असावे. कर्नाटकातील कल्याण चालुक्यांच्या काळातील अनेक मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर गजलक्ष्मीचे अंकन दिसते. महाराष्ट्रात कोकणात हिला भावई किंवा भावकाई नावाने पूजले जाते. जवळ जवळ प्रत्येक गावात हिचे मंदिर किंवा मूर्ती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील अनेक खेडय़ांमध्ये अजूनही ज्यांना मूल होत नाही अशा स्त्र्ायांनी या देवीची उपासना केली की, त्यांना मूल होईल असा मोठय़ा प्रमाणावर समज आहे. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही तिची पूजा केली जाते. त्यामुळे अनेक खेडय़ांमध्ये हिची मूर्ती आढळतेच.

हिंदुस्थानातील लोक ज्या देशांमध्ये गेले तेथे ते त्यांचा धर्म आणि देवदेवता घेऊन गेले. यामध्ये सर्वधर्मीय देवदेवतांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये प्राचीन काळी हिंदुस्थानी व्यापारी मोठय़ा प्रमाणावर जात असत आणि बरेचसे तिथेच राहत असत. कंबोडिया, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्मीय अनुयायी मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य करून होते. त्या धर्मांचा प्रसार त्या त्या देशांमध्येही झाला आणि मोठमोठी मंदिरे आणि स्तूप उभे राहिले. त्यामध्येही गजलक्ष्मीची शिल्पे पाहायला मिळतात. कंबोडियातील बांते श्राय येथे एक भव्य शिल्प आढळते. तसेच श्रीलंकेत पोलोनरुवा येथील निस्संकमल्ल या राजाने लिहिलेल्या (‘गलपोथा’ म्हणजे दगडाचे पुस्तक म्हणून प्रसिद्ध असलेल्या) मोठय़ा शिलालेखावर गजलक्ष्मीचे सुरेख शिल्प पाहायला मिळते.
राजा रविवर्मा यांनी काढलेल्या उत्कृष्ट चित्रांमध्ये एक चित्र गजलक्ष्मीचे आहे, पण त्यांनी हे चित्र काढताना पारंपरिक संकल्पनेत थोडा बदल केला. हत्तींच्या सोंडेत कलश देण्याच्या ऐवजी त्यांनी कमळाची फुले दाखवली. पुढे या चित्राच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या अनेक प्रती तयार होऊन त्या घराघरांत पोहोचल्या. त्यामुळे आज आधुनिक घरांमध्ये असलेल्या चित्रात आणि प्राचीन शिल्पात थोडा फरक दिसतो, पण संकल्पना मात्र तीच दिसते. त्यामुळे नवरात्र असो वा दिवाळी, जेव्हा जेव्हा सृजनता, सुफलन आणि समृद्धीची पूजा होते तेव्हा गजलक्ष्मीची हमखास पूजा केली जाते. बऱयाचदा तिची पूजा या देवीची मूळ संकल्पना माहीत नसतानाच होते. जर ती समजून घेतली तर तिच्याप्रति असलेल्या भक्तीत भरच पडेल यात मात्र शंका नाही.

(लेखिका पुरातत्व तज्ञ आहेत)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या