गजानन कीर्तिकर यांची संजय निरुपम यांच्यावर अडीच लाख मतांनी मात

95

सामना प्रतिनिधी । मुंबई

निवासी आणि औद्योगिक केंद्रांचा समावेश असलेल्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क याच्या बळावरच ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी सलग दुसऱयांदा या मतदारसंघातून महाविजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्यावर 2 लाख 60 हजार 553 इतक्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा लोकसभेत जाण्याचा मान मिळवला आहे.

गेली पाच वर्षे कीर्तिकर यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी गोरेगाव आणि अंधेरी या रेल्वे स्थानकांच्या आधुनिकतेचा प्रश्न केंद्राकडे पाठपुरावा करून सोडवला. शिवाय विभागातही अनेक विकासकामांचा धडाका लावून दिंडोशी, गोरेगाव, अंधेरी, वर्सोवा आणि मालाडच्या नागरिकांना उत्तम रस्ते, शौचालये, उद्याने आणि अन्य मूलभूत सुविधा मिळवून दिल्या त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित होता.

मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा निवासी आणि औद्योगिक पट्टा असा संमिश्र असल्याने या विभागाचा विकास म्हणजे एक मोठे आव्हानच होते. पण राजकारणासोबत समाजकार्याचा दांडगा अनुभव व शिवसैनिकांचे सहकार्य आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर खासदार कीर्तिकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसह उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या समस्याही कुशल नेतृत्वाने सोडवल्या आहेत.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मला दुसऱयांदा मिळालेला मोठा विजय ही खासदार म्हणून मी केलेले विकासकार्य, मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेत उठवलेला आवाज आणि शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना मिळालेली पोचपावतीच आहे.
– गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते

आपली प्रतिक्रिया द्या