‘गजानना अवलिया, अवतरले जग ताराया’ कोरोनामुळे श्रींचा 143वा प्रगटदिन महोत्सव भक्ताविना साजरा

राजेश देशमाने

‘गजानना अवलीया, अवतरले जग ताराया’ आणि ‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत गजानन महाराजांचा 143वा प्रगटदिन उत्सव आज शुक्रवार 5 मार्च रोजी भक्तांविना भक्तीमय वातावरणात मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे पार पडला. संत गजानन योगी शेगावमध्ये प्रगटले, त्याला आज 143 वर्ष झाली. तो दिवस प्रगट दिन म्हणून संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

यासाठी राज्यभरातून दरवर्षी 1200 दिंड्या आणि लाखो भाविक या उत्सवासाठी संतनगरीत दाखल होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे संस्थानमधील काही मोजक्या कर्मचारी व ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत भक्तांविना पार पडला. ब्रह्मवृंदांच्या हस्ते यागाची पुर्णाहूती देण्यात आली. त्यानंतर कीर्तन झाले. आणि दुपारी 4 च्या सुमारास श्रींची पालखी मंदिर आवारातच गजाननाचा जयघोष करीत मिरविण्यात आली. यावेळी उपस्थित ब्रह्मवृंद व कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी सुद्धा केली.

संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव म्हणजे लाखो भाविकांसाठी पंढरीची यात्राच असते. विदर्भाची पंढरी म्हणवल्या जाणार्‍या संतनगरी शेगावात या उत्सवासाठी राज्यभरातून नव्हे तर देशविदेशातून श्रींचे लाखो भक्त शेगावात दाखल होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे संत गजानन महाराजांचा 143 वा प्रगट दिनोत्सव संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे भक्तीमय वातावरणात पार पडला.

सकाळी 10 वाजता महारुद्र स्वाहाकार, अवभृतस्थान व यागाची पुर्णाहुती ब्रह्मवृंदांनी दिल्यानंतर प्रकटदिनानिमित्त कीर्तन कार्यक्रम मोजक्या कर्मचार्‍यांसमोर पार पडला. त्यानंतर श्रींची पालखी, पालखीत श्रींचा रजत मुखवटा ठेवण्यात आला. विधिवत पूजन करुन रथ, मेणा, गज अश्वासह श्रींची पालखी मंदिर परिसरातच परिक्रमा करती झाली. उद्या काल्याच्या कीर्तनाने प्रगटदिन उत्सवाची सांगता होणार आहे.

कोरोनामुळे यावर्षी मंदिर बंद आहे. त्यातच आजचा प्रगटदिन महोत्सव असल्याने काही भक्तांनी शेगावात आपली हजेरी लावून गजानन महाराज मंदिराचे बंद प्रवेशद्वारावर हारपुष्प अर्पण करुन मंदिराच्या कळशाचे दर्शन घेतले. तर अनेक भाविक भक्तांनी घरोघरी पारायण करुन गजानन महाराज प्रगटदिन साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या