गलवान घाटीत कमांडीग ऑफिसरसह 5 सैनिक मारले गेल्याचा चीनचा दावा

लडाखमधल्या गलवान घाटीमध्ये हिंदुस्थानी सैनिकांनी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैनिकांचा कडवट प्रतिकार केला होता. या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. मात्र चीनने आतापर्यंत त्यांचे किती सैनिक मारले गेले, याचा आकडा जाहीर केला नव्हता. ‘द हिंदू’ या वर्तमापत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय की चीन आणि हिंदुस्थानच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच चीनने त्यांचे किती जवान मारले गेले याचा आकडा सांगितला. कमांडीग ऑफिसरसह आपले 5 जवान मारले गेल्याचं चीनचं म्हणणं आहे. यापूर्वी चीनने आपलेही जवान मारले गेल्याचं मान्य केलं होतं, मात्र आकडा सांगितला नव्हता. चीनने जरी दावा केला असला की त्यांचे 5 जवान मारले गेले आहेत तरी अमेरिकेच्या आणि हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांनी हा आकडा किमान 40 असावा असे म्हटले आहे.

गोळ्या झाडण्यास हिंदुस्थानी सैनिक मागेपुढे पाहणार नाहीत
चीनसोबतच्या बैठकीमध्ये हिंदुस्थानच्या प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आमचे सैनिक स्वत:च्या आणि देशाच्या भूभागाच्या सुरक्षेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. जर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली तर आमचे सैनिक गोळ्या झाडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असेही हिंदुस्थानच्या प्रतिनिधींनी ठणकावून सांगितले. एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की या बैठकीमध्ये हिंदुस्थानने चीनला सांगितले आहे की यापुढे ढकलाढकली, धक्काबुक्की अजिबात सहन केली जाणार नाही असे हिंदूने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. जर चिनी सैनिकांनी पारंपरीक हत्यारे वापरली तर हिंदुस्थानी सैनिक त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास मागेपुढे पाहणार नाही असेही चिनी अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. चीनने या बैठकीमध्ये पँगाँग तलाव आणि आसपासच्या क्षेत्रातून हिंदुस्थानी सैन्याने आपले सैन्य मागे घ्यावे अशी मागणी केली होती. यावर हिंदुस्थानने फक्त हा भागच नाही तर संपूर्ण लडाखमधली परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी जोर देण्याची गरज असल्याचे म्हटले. पुढील मे महिन्यापूर्वी परिस्थिती पूर्ववत व्हावी असे हिंदुस्थानने म्हटले आहे.

म्हणून चीनने मृत सैनिकांचा आकडा लपवला
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हिंदुस्थानने शहीद सैनिकांचा आकडा जाहीर केला होता. मात्र चीनने तो जाहीर करणं सातत्याने टाळलं होतं. साऊत चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार जेव्हा हा संघर्ष झाला तेव्हा चीन आणि अमेरिकेत एक महत्वाची बैठक होणार होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने आपलं काहीच नुकसान झालं नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच चीनने त्यांच्या मृत सैनिकांचा आकडा जाहीर केला नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या