शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र दिल्याने वडील असंतुष्ट, म्हणाले परमवीर चक्र मिळायला हवे होते!

गेल्या वर्षी जून महिन्यात चिनी सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण प्राप्त झाले होते. या संघर्षादरम्यान त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर कर्नल संतोष बाबू यांचे वडील असंतुष्ट आहेत. आपल्या मुलाला परमवीर चक्राने सन्मानित करायला हवे होते अशी मागणी बी.उपेंद्र यांनी केली आहे.  आपल्या मुलाला महावीर चक्राने सन्मानित करण्यात येणार असल्यामुळे मी दु:खी नाहीये मात्र मी या निर्णयाबाबत असंतुष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या मुलाने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्या यथोचित सन्माम  होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

15 जून 2020 रोजी झाला होता गलवान खोऱ्यात संघर्ष

बी.उपेंद्र यांनी म्हटलंय की त्यांच्या मुलाने जे धाडस आणि शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना सैन्यदलातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परमवीर चक्राने सन्मानित करणं गरजेचं होतं.  कर्नल संतोष बाबू यांनी जो पराक्रम गाजवला त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून यामध्ये सैन्य दलातील जवानांचाही समावेश आहे असे बी.उपेंद्र म्हणाले.  कर्नल संतोष बाबू हे 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिग ऑफिसर होते. 15 जून 2020 रोजी चिनी सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यामध्ये हिंदुस्थानच्या जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता हिंदुस्थानच्या सीमेचे रक्षण करत घुसखोरी करणाऱ्या चिन्यांशी संघर्ष केला होता. यामध्ये यामध्ये 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते ज्यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश होता.

केंद्र सरकारवर व्यक्त केली नाराजी

कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे साथीदार चिन्यांशी हातात कोणतंही शस्त्र नसताना लढले होते.  या संघर्षात चिन्यांचे किती सैनिक मारले गेले हे अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केलेले नाही. मात्र या संघर्षात त्यांची जास्त जिवीतहानी झाल्याचे कळाले आहे. हिंदुस्थानच्या जवानांनी अतुलनीय धाडस दाखवत चिनी सैनिकांना सळो की पळो करू सोडलं होतं. आपले सैनिक हे त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सक्षम आणि मजबूत आहेत हे या घटनेवरून दिसून आल्याचं बी.उपेंद्र यांनी म्हटले आहे.  कर्नल बाबू यांच्या परिवाराला विभागीय लाभापलिकडे केंद्र सरकारकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबांना जे लाभ मिळतात ते मिळाले नसल्याचंही बी.उपेंद्र यांनी म्हटले आहे. तेलंगाणा सरकारने कर्नल बाबू यांच्या कुटुंबाला 5 कोटींची आर्थिक मदत, पत्नीला क्लान-1 नोकरी आणि घरासाठी एक जागा देऊ केली आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या