अंधेरीत साकारणार सर्वधर्मीयांचा बाप्पा

 

 

आपल्या घरात लग्नपत्रिका, सत्यनारायण पूजा, धार्मिक पत्रके, सामाजिक कार्यक्रमांची आमंत्रणे, ग्रीटिंग कार्ड अधूनमधून येतच असतात. पत्रिकेवरची कार्यक्रमाची तारीख उलटून गेली की, या महागडय़ा पत्रिका रद्दीत किंवा कचऱयात जातात. मात्र याच पत्रिकेच्या कागदापासून गणेशमूर्ती साकारली तर… अंधेरी पश्चिम येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मॉडेल टाऊनतर्फे निमंत्रण पत्रिकांच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्यात येणार आहे. त्यासाठी मागील आठ महिन्यांपासून सर्वधर्मीयांकडून जातीय, धार्मिक निमंत्रण पत्रिका, लग्नपत्रिका व इतर पत्रिका जमा करून गणेशमूर्तिकाराला सोपविण्यात आल्या आहेत.

पर्यावरणपूरक श्रीगणेशाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्याची ही संकल्पना प्राचार्य शिक्षण महर्षी अजय काwल, देवेंद्र आंबेरकर व प्रशांत काशीद यांची होती. सर्वधर्मीयांचे धार्मिक आमंत्रण पत्रिका, लग्नपत्रिका कार्यक्रम संपल्यानंतर कचरापेटीत टाकल्या जातात. या पत्रिकांवर देव, देवतांची चिन्हे असतात. त्यामुळे गेल्या वर्षी मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय लोकांना या पत्रिका मंडळाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या पत्रिका जमा करण्यासाठी मुंबई महापालिका के पश्चिम विभागाने एक कलशदेखील दिला होता. सर्वधर्मीय नागरिकांनी पत्रिका या कलशात टाकल्या. जमा झालेल्या पत्रिकांचे वजन तब्बल 60 किलो एवढे होते. या कागदापासून सर्वधर्मीय श्रीगणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यात येणार आहे. सदर मूर्ती ही 9 फुटांची असणार आहे.

नुकताच या सर्वधर्मीय नागरिकांच्या आमंत्रण पत्रिका मूर्तिकाराला सुपूर्द करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे उपायुक्त परिमंडळ-4 चे विश्वास शंकरवार, देवेंद्र आंबेरकर प्रमुख मार्गदर्शक, प्रशांत काशीद उपाध्यक्ष एकता मंच, राजेश ढेरे अध्यक्ष, अनिल राऊत सल्लागार, संजीव कल्ले बिल्लू, अशोक मोरे, राजेश शेट्टे उपविभागप्रमुख, सिद्धेश चाचे, विकी गुप्ता, शौकत विराणी, जयवंत राऊत, अंकुश पाटील, सतीशचंद्र ठाकूर, प्रकाश जोशी, स्वप्नील शिवेकर, सूर्यकांत आंबेरकर उपस्थित होते. या वेळी कलशातील पत्रिका मूर्तिकार नरेश मेस्त्राr यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक देवेंद्र आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.