गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटय़ाला लटकंतीच! रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका

>> बापू सुळे

गणेशोत्सवानिमित्त मुंबई-ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटय़ाला यंदा लटकंती येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल-सावंतवाडीदरम्यान 30 गणपती विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे या विशेष गाडय़ांना कोकणात पोहोचण्यास तब्बल 15 ते 16 तास लागणार आहेत. तसेच काही कारणामुळे गाडी सायडिंगला पडल्यास लटकंतीचा वेळ वाढणार आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कुचंबणा होणार आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणपती विशेष गाडय़ा चालवल्या जातात. त्यामुळे अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाले आहे. पण गणेशोत्सवकाळात कोकण रेल्वे मार्गावर जवळपास अडीचशे गणपती स्पेशल गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांना मुंबईतून सावंतवाडीला पोहोचण्यास जास्तीत जास्त 9 ते 10 तास लागतात. मात्र 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष गाडय़ांना सावंतवाडीला पोहोचण्यास पंधरा तासांहून अधिक वेळ लागणार आहे. परतीच्या प्रवासाचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

कोकणकन्या एक्प्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सावंतवाडीला पोहोचण्यास दहा तास लागतात. तुतारी एक्प्रेसलाही तेवढाच वेळ लागतो.

पहाटे तीन वाजता सावंतवाडीला पोहोचणार

पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाडय़ा दुपारी 12 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटणार आहेत. त्यानंतर तब्बल पंधरा तासांच्या प्रवासानंतर सदरची गाडी पहाटे 3 वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर त्याआधीच्या स्थानकात सदर गाडी मध्यरात्री 12-1 च्या सुमारास पोहोचणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकातून घरी जाण्यासाठी स्थानिक वाहने उपलब्ध असणार नाहीत. तसेच उपलब्ध असलेल्या वाहनासाठी 1000 ते 1200 रुपयांची खिशाला चाट लागणार असल्याचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी सांगितले.

कोकण रेल्वे मार्ग एकपदरी असल्याने अनेकदा गरजेनुसार विशेष गाडय़ा सायडिंगला टाकल्या जातात. तसेच सध्या कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू असल्याने एक्प्रेस गाडय़ा केवळ ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने धावत आहेत. परिणामी रेल्वेच्या नियोजित वेळापेक्षाही जास्त लटकंती होण्याची भीती आहे.