मजरेवाडीतील मशीदीत गणपती व पीरपंजाची केली एकत्र स्थापना

740

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी या गावाने हिंदू- मुस्लीम ऐक्याची अनोखी पंरपरा जोपासली आहे.  गावामध्ये एक ही मुस्लीम कुटुंब नसतानाही  गावातील हिंदू ग्रामस्थांनी एकत्र येत मशीद उभारली आहे. या मशिदीत गणपती व पीरपंजाची प्रतिष्ठापना करण्यात येते. या परंपरेने राज्यात हिंदू मुस्लीम ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे़.

या मशीदीत पटवर्धन संस्थानिकांकडून पीर पंजाची स्थापना मोहरमच्या काळात करण्यात येत होती. याची सर्व व्यवस्था पटवर्धन संस्थानिक पाहत होते़. मध्यतंरीच्या काळात या मशिदीकडे ग्रामस्थ आणि पटवर्धन संस्थानिकांचे दुर्लक्ष झाले़. त्यामुळे मशीदीची पडझड झाली. मात्र, या स्थानाबाबतची आस्था कायम होती. त्यामुळे गावातील हिंदू बांधवांनी कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता गावात व परिसरात वर्गणी काढून चार वर्षापूर्वी आठ लाख रुपये खर्चून मुस्लीम धर्माच्या रीतीरिवाजानुसार नव्याने मशीद उभारली. मशिदीमधील धार्मिक विधी कुरुंदवाडमधील दस्तगीर हसन मुल्ला पाहतात. या मशिदीत पीर पंजाबरोबर गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

यावर्षी दोन्हीही सण एकत्र आल्याने या मशिदीत गणेशमुर्ती व पीर पंजाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी मुस्लीम

धर्माचा केलेला आदर ऐक्याचे अनोखे प्रतीक आहे. मजरेवाडी येथे नुकत्याच आलेल्‍या महापुराचे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून ग्रामस्थ सावरले नसतानाही ग्रमास्थांनी उत्साहाने ही अनोखी परंपरा पुढे नेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या