कागदाच्या लगद्यापासून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पचरित्र

गणेशोत्सवात एकापेक्षा एक सरस सजावट करण्यासाठी सर्वच मंडळे प्रयत्नशील असतात. त्यामध्ये आपले वेगळेपण जपण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असतात. असाच एक प्रयत्न जोगेश्वरीच्या बांद्रेकरवाडी मित्र मंडळानेही केला आहे. हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त या मंडळाने कागद आणि पुठ्ठ्यांचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पचरित्र तयार केले आहे. या इकोफ्रेण्डली देखाव्याचं शिवप्रेमींनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडी मित्रमंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम सादर करुन आपलं वेगळेपण जपत असतं. यंदा मंडळाचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने ते अनोख्या पद्धतीने साजरे करण्यासाठी सहा महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरु केली होती. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत बाप्पाची अडीच फुटाची मातीची मूर्ती बसवण्यात आली आहे. हिरकमहोत्सवी वर्ष असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवासावर आधारित देखावा तयार करावा असं मंडाळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले. यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील 22 कथा कलाकृतीतून सादर केल्या आहेत.

whatsapp_image_2021-09-16_at_1-04-40_pm_700x450

मंडळाचे सचिव शुभम एरंडोले या कलाकाराच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रशिल्प तयार करण्यात आले आहे. या चित्रशिल्पासाठी तब्बल 1000 किलो कागद आणि पुठ्ठ्यांचा वापर केला आहे. याबाबत शुभम म्हणतो, एखादी कलाकृती कागद-पुठ्ठे वापरुन तयार करणे सोपी गोष्ट नाहीय, कारण त्यांना मॉईश्चर पकडण्याचा धोका असतो. त्यामुळे हे चित्रशिल्प तयार करणं सोपं नव्हतं. शुभमने अनेक कलाकरांना हाताशी घेऊन सहा महिन्यांच्या कालावधीत अहोरात्र मेहनत घेऊन हे चित्रशिल्प तयार केल्याचे त्याने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे रिअॅलिस्टीक शिल्प सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या