शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश मोरे यांचा अपघाती मृत्यू

शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (40) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. बीडहून लिंबागणेश येथे गावी दुचाकीवरून जात असतांना मोरे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकीला धडक दिल्याने मोरे हे जखमी झाले होते आणि त्यांच्या डोक्याला जबरी मार लागला होता. या अपघातात मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश गोपाळ मोरे हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते आणि एक उत्तम कबड्डीपटू होते. मागील 20 वर्षांपासून ते शिवसैनिक म्हणून काम करत होते.

शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता गणेश मोरे हे बीडहून लिंबागणेश या त्यांच्या गावी दुचाकी (एम.एच.23 ए.व्ही 0017 ) ने निघाले होते. वाटेत बीड-मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. या अपघातात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळून डोक्याला गंभीर मार लागला होता. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस पीएसआय डी.बी आवारे, जमादार आनंद मस्के, मदतनीस जी.व्ही.कांदे, वाहनचालक खय्यूम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवून पाहणी केली. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी गणेश मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवून तो बीड जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मोरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मोरे यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

लिंबागणेशवर शोककळा

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील गणेश गोपाळ मोरे हे एक सामान्य कुटुंबातील तरूण कबड्डीपटू होते. शिवसेनेसाठी ते करत असलेले काम पाहून त्यांची बीड तालुका उपप्रमुख म्हणून निवड झाली होती. गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातून कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करून नवनवीन खेळाडू तयार व्हावे यासाठी मोरे सातत्याने धडपडत होते. यामुळे त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.