‘पीओपी’च्या गणेशमूर्ती मुंबईच्या प्रवेशद्वारावर रोखा

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जनानंतर विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याने मुंबईत येणाऱया ‘पीओपी’च्या मूर्ती मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखा, सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून तपासणी करा अशी मागणी गणेश मूर्तिकला समितीने पालिकेला केली आहे. याबाबत समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत राजे यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.

पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेता सर्वेच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. जल अधिनियम, 1974 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 सारखे कायदे, सर्वेच्च व मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश, राष्ट्रीय हरित लवाद यांचे नियम व पेंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग, भारत सरकार यांच्या वतीने पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी 12 मे 2020 रोजी जाहीर केलेले सुधारित मूर्ती विसर्जनाची मार्गदर्शक तत्त्वे हे सर्व आहेत. मात्र मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली जात नाही, असेही वसंत राजे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.