रिव्हॉल्व्हर जमा करा; पोलीस ठाण्यात 2 दिवस हजर राहा, भाजप आमदार गणेश नाईकांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन

महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देणे आणि तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज मंजूर केला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी गणेश नाईक यांचा जामीन अर्ज मंजूर केला. हा अर्ज मंजूर करतानाच तपासात सहकार्य करण्यासाठी दोन दिवस पोलीस ठाण्यात हजर रहा, धमकावण्यासाठी वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर आठवड्याच्या आत पोलिसांकडे जमा करा आदी अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

भाजप आमदार गणेश नाईक हे आपल्यासोबत 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगाही झाला आहे. हे प्रकरण अंगलट आल्यानंतर नाईक यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिली तसेच शारीरिक अत्याचार केले असा आरोप करत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सीबीडी बेलापूर आणि नेरूळ या दोन पोलीस ठाण्यांत नाईक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नाईकांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली; मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी नाईक यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे नाईक यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. पीडित महिला व आरोपी नाईक हे 1995 ते 2017 सालापर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे प्रथमदर्शनी याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवत आरोपी नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्तींनी मंजूर केला. इतकेच नव्हे, तर नाईक यांनी सोमवार व मंगळवारी सीबीडी पोलीस ठाण्यात हजर राहावे, तक्रारदार व पुराव्यांशी छेडछाड करू नये, धमकावण्यासाठी वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर पोलीस ठाण्यात आठवडाभरात जमा करावे, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत.