हॅन्डलूमच्या विश्वातील उगवता ब्रँड… ‘उज्वलतारा’

ganesh-puranik>> गणेश पुराणिक । नगर

मानवाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे वस्त्र. पूर्वीच्या काळी हिंदुस्थानची ओळख ही कपड्यांसाठी होती. इतिहासामध्ये याचे अनेक दाखले मिळतात. ५ हजार वर्षांपूर्वीच्या हिंदुस्थानी संस्कृतीची ओळख असलेल्या मोहेंजोदरोमधील भित्तीशिल्पे आपल्याला पहावयास मिळतात. इजिप्तमधील काही भित्तीशिल्पांमध्ये राजहंस परिधान केलेली शिल्पे आपल्याला आढळतात. इजिप्तमध्ये राजहंस हा प्राणी अतित्वात नव्हता. त्याकाळी हिंदुस्थानात कापडांवर हंसांच्या आकृतीचे कशिदाकाम केले जाई. त्यामुळे इजिप्तमधील भित्तीचित्रात ज्या स्त्रिने हंसाचे वस्त्र धारण केले आहे ते वस्त्र हिंदुस्थानात तयार झाले असावे असा संशोधकांचा ठाम विश्वास आहे. सिकंदराने हिंदुस्थानावर आक्रमण केल्यानंतर ग्रीसला परतताना सैनिकांनी त्यांच्या पारंपारिक लोकरीच्या पोषाखांऐवजी येथील सुती कपडे परिधान केली होती. कारण ते उष्णतेमध्ये जास्त आल्हाददायक होते.

हिंदुस्थानची ही समृद्ध वस्त्रपरंपरा अभिमानास्पद अशीच आहे. याच वस्त्रपरंपरेतील एक प्रकार म्हणजे हातमाग होय. हाताने कपडा विणला जातो त्यास हातमाग म्हटले जाते. नंतर त्यांवर कलाकुसर केली जाते. जगभरात सध्या हातमागाच्या वस्तूंना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. या वस्तू दिसण्यास आकर्षक असतातच शिवाय यावरील काम अतिशय नाजूक असते. त्यामुळे लोकं हवी तेवढी किंमत देऊन ती खरेदी करताना दिसतात. याच हातमागाच्या क्षेत्रामध्ये हिंदुस्थानातील लोकांना विक्रीसाठी प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न उज्वल समांत या करताना दिसत आहेत. त्यांचा ‘उज्वलतारा’ हा ब्रँड सध्या नावारुपाला येत आहे. याचसंबंधी त्यांच्याची आम्ही चर्चा केली…

१) उज्वलतारा या ब्रँडची संकल्पना काय होती आणि हे कसं सुचलं?
उज्वलतारा हा ब्रँड हा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नावारुपाला आला आहे. परंतु त्याआधी पाच ते सहा वर्ष मी विविध प्रदर्शनांचे आयोजन दक्षिण मुंबईमध्ये केले होते. त्याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना ही संकल्पना सुचवली. कारण हातमागावरील या वस्तू फक्त प्रदर्शनापुरत्या मर्यादित न राहता त्यांना एका ब्रँडद्वारे कायमस्वरुपी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावे याचा विचार सुरू होता आणि त्यानंतर उज्वलताराची सुरुवात झाली.

२) इथपर्यंतचा प्रवास कसा झाला?
एक महिला उद्योजिका म्हणून हा प्रवास खूप खडतर होता. हातमागाच्या क्षेत्रामध्ये मराठी लोकं खूप कमी आहे. हिंदुस्थानातील ८० हातमागावरील कामं ही मुसलमान स्त्रिया करतात. त्यामुळे या लोकांना एकत्र करणं हे एक टास्क होते आणि त्यांच्याबरोबर असोसिएट करून त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणे आणि त्यांना हे पटवून देणं खरंच खूप खडतर होते. यात अनेकवेळा अपयश आले, पण एक पॅशनमुळेच मी हे सुरू ठेवले.

३) मुंबईत किती प्रदर्शनं भरवली आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे?
गेल्या ५ ते सहा वर्षामध्ये मुंबईमध्ये प्रदर्शनं भरवली आहेत. मुंबई हे खूप मोठे मार्केट असल्याने आम्ही इथेच करण्याचे ठरवले. नक्की आकडा आता आठवत नाही. लोकांच्या रिप्लॉन्सबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबई किंवा बाहेरील हायक्लास लोकांना पूर्वीपासूनच हातमागावरील वस्तूंचे आकर्षण आहे. हातमागावरील वस्तू एक वेगळाच फिल देतो असे त्यांचे म्हणणे आहे. राजकारणी लोकं किंवा कलाकार मंडळी शक्यतो हातमागावरील कापड किंवा वस्तू वापरतात. पण हे अगदी तळागाळात पोहोचवणे आवश्यक आहे. हातमागावरील कापड नैसर्गिक लूक देतो आणि आपल्या शरीरासाठीही ते हितकारक आहे. महाराष्ट्राच्या पैठणीसह हिंदुस्थानात प्रत्येक राज्याची एक वेगळी कला आहे आणि तो कपडा घातल्यावर एक वेगळाच फिल येतो आणि सुंदरही वाटते.

४) कोणत्या भागातून लोकं येतात?
नागालँड, पौडेचेरी ते कन्याकुमारी संपूर्ण हिंदुस्थानतून लोकं आपली कला प्रदर्शनात दाखवण्यासाठी येतात. यावेळी काळाघोडाच्या प्रदर्शनाला अफगानिस्तातील एकानं सहभाग घेतला होता, त्यामुळे आम्ही आता सिमाउल्लंघन केले आहे. त्याच्याकडे हाताने तयार फॅशनेबल ज्वेलरी होत्या. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या प्रदर्शनामध्ये हातमागावरील कापड नाही तर हँडीक्राफ्ट म्हणजे हाताने तयार केलेल्या वस्तूही असतात. यात खड्यांची ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी (हाताने तयार केलेली) आहे, याला फिलिग्री असे म्हणतात. हिंदुस्थानामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक अनोखी कला लपलेली आहे. प्रदर्शनामध्ये त्यांच्या वस्तूची किंमत तेच ठरवतात हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनामध्ये ५०० रुपयांपासून दीड लाखांपर्यंतच्या वस्तूही असतात.

५) हातमागावरील कोणती वस्तू सर्वात महाग आहे?
पटोल्या साड्या ज्या गुजरातमधून येतात त्या सर्वात महाग आहेत. अहमदाबादमध्ये साळवी कुटुंबाकडे सरकारी लायसन्स आहे. पटोला हा धागा आणि त्याच्या प्रोसेसला खूप वेळ लागतो. एक पटोला साडी बनवण्यासाठी तीन ते चार महिने लागतात. सिल्क महाग असल्याने जास्त किंमत असते. तसेच पॅचवर्कचे कापडही महाग असते. एका धाग्यावर दुसरा धागा विणून त्याची क्वालिटी वाढवली जाते. त्याचे खूप बारिक काम असते. लखनवीही प्रोडक्ट खूप महाग असते. बादलावर्कची लखनवी साडी महाग असते. साड्यावर चंदेरी रंगाचे धागे दिसतात त्याला बादलावर्क म्हणतात.

६) हातमागावरील कापडाची काळजी कशी घ्यावी?
हातमागावरील कापड जास्त दिवस टिकतात. या कपड्यांना व्यवस्थित हवा लागू द्यावी. जास्त काळ कपाटामध्ये ठेवू नये. या कपड्यांना जास्त कडक उन्हामध्ये ठेवू नये. कॉटनचे कपडे असतील तर ते होम वॉशही करू शकता, इंडिगो रंगाचे कपडे असतील तर ते ड्रायक्लीन करावे.

७) पुरुषांसाठीही या ब्रँडअंतर्गत वस्तू कधी मिळणार?
लोकांचा या ब्रँडला पाठिंबा वाढत असून लवकरच पुरुषांसाठीही सुरू करणार आहे. सध्या महिलांचा चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याने आधी महिलांसाठी सुरू करण्यात आला. या महिला काही एनजीओसाठी काम करत असतात त्या एनजीओंना आम्ही आमच्या प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेतो आणि विक्रीची संधी देतो. कारण गावाकडे ते बोलतात ना जिथे पिकतं तिथे विकत नाही. त्यामुळे एकेकाला संधी देण्यापेक्षा ज्या एनजीओसाठी त्या काम करतात त्यांना सहभागी करून घेतो.

८) हातमागाचे कापड आणि इतर कापड यामधील फरक काय?
हातमागाचे कापड कॉटन, सिल्क, मलमल या सर्व प्रकारांमध्ये येते. फॅशनच्या विश्वामध्ये अनेक नवे प्रयोग सुरू आहेत. हातमागावरील कपडे उन्हाळ्यात घातल्यास थंड वाटते आणि हिवाळ्यात घातले तर उबदार वाटते. या कपड्यात कन्पर्टेबल फिल होते. मात्र सिंथॅटिक कपडे ही शरीरासाठी हितकारक नसतात. सध्या विविध रंगामध्ये हातमागाचे कापड उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी एक दोन रंग वापरले जात त्यामुळे ते जास्त आकर्षक होत नव्हते परंतु नवीन शोधामुळे तरुणांसाठी त्यांना आवडेल अशी रंगात हे कापड सध्या उपलब्ध आहेत.

९) हँडिक्राफ्टमध्ये जास्त कशाची मागणी असते?
महिलांच्या पर्सेसला जास्त मागणी असते. कोलकाता, बंगाल, पंजाबपासून कन्याकुमारीपासून सर्व भागातून पर्स येतात. घरामध्ये वापरात येणाऱ्या डेकोरेशनच्या वस्तू (बेल, झुंबर, भित्तीचित्र) जास्त मागणी असते. आमच्या प्रदर्शनामध्ये एक आध्रामधून कलाकार आला होता. प्रदर्शनामध्ये तो स्त्रियांच्या पायांची मापं घेऊन तिथल्या तिथे चपला बनवून देत होता. तुमच्याकडे असणाऱ्या कापडापासून तो ताड्या बनवून चपलांच्या वरील आवरण तयार करत होता. ही कन्स्पेप्ट लोकांना खूप आवडल्याने त्याचा प्रचंड खप झाला.

१०) तरुणांना याकडे वळण्यासाठी काय सांगाल?
हँडिक्राफ्ट हा हिंदुस्थानचा वारसा असून यासाठी लायसन्सही सरकार देते. म्हणजे वंशपरांपगत सुरू ठेवता येते. आपण त्यांना विक्रीचे माध्यम मिळवून दिल्यास हा वारसा नक्कीच जपला जाईल. शेतीनंतरचा हातमाग हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याला एक प्लॅटफॉर्म दिला जाणे आवश्यक आहे.

११) तुमच्याकडे कोणत्या वस्तू विक्रीसाठी असतात?
उज्वलताराअंतर्गत हँडिक्राफ्टच्या वस्तूंना एक प्लॅटफॉर्म दिला जात आहे. दादरच्या रानडे रोड आमचे शॉप आहे. आमच्याकडे हाताने तयार केलेली उशीची कव्हर, बेडशीट, पर्स, तरुणींसाठी वनपीस, साड्या, लिनन साड्या, सिल्कचे सर्व प्रकार, खादी सिल्क, खादी लिनन, मटका सिल्क, महेश्वरी, प्युअर कॉटन, ढाक्का, कांथावर्क, कच्छी वर्क, ब्लॉक प्रिंट, अजरक वर्क, सी क्वीन उपलब्ध आहे. मार्केटमध्ये नवीन असल्याने सध्या रिसर्च सुरू असून लवकरच हे प्रोडक्ट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असते.