जबरदस्त बातमी! गणेशोत्सवासाठी यंदा एसटीचे रिटर्न बुकींग

47

सामना ऑनलाईन, मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदाही जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासनाने यंदा तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे.  28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे ऑनलाईन, आरक्षण 27 जुलैपासून सुरू होणार असून महत्वाची बाब ही आहे की यावर्षीपासून परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

20 जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात..

गणपती उत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी गणेशभक्त गटागटाने बस आरक्षित करतात. एकगठ्ठा बुकींग केल्याने प्रवाशांचा त्रास बराच कमी होतो. अशा एकगठ्ठा आरक्षणाला म्हणजेच ग्रुप बुकींगला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. ज्यांना ग्रुप बुकींग करायचे आहे अशांना जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच  7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा  बसेसची सोय करण्यात आली  आहे.कोकणातील महामार्गावर ठीक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके  (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात  तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या