Ganeshotsav 2024 – रंगारी बदक चाळीत अवतरले अक्कलकोट!

लालबागमधील जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी एक असलेले आणि पारंपरिक वैशिष्टय़े जपणारे मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 85 वे वर्ष साजरा करत आहे. श्री स्वामी समर्थ साक्षात्कार अशी मंडळाच्या देखाव्याची यंदाची थीम असून यानिमित्ताने लालबागमध्ये अक्कलकोट अवतरले आहे. स्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामी सूत यांनी सांगितलेल्या स्वामी समर्थांच्या बाल स्वरूपाच्या प्रकट दिनाचे कथानक देखाव्यातून साकारण्यात आले आहे.

संत ही परंपरा आपल्याकडे वेगळी ओळख करून देणारी आहे. या संतांमध्ये काही सिद्धपुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या वाणीतून आणि आचरणातून सकारात्मक बदल घडवला. त्यातीलच एक नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी आपल्या जीवनप्रवासात न्याय व्यवस्था, अन्नदान आणि आपण प्राण्यांवर का प्रेम केले पाहिजे? निसर्ग हाच आपला गुरू आहे, निसर्गावर प्रेम करा, निसर्गातील रूढी-परंपरा यावर प्रेम करा, अशा विविध गोष्टी सांगत त्यांनी समाजात सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न केला. तोच संदेश विविध देखाव्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. लालबागमध्ये प्रथमच पर्यावरणपूरक आणि भव्यदिव्य असा मुख्य प्रवेशद्वार व देखावा साकारला असून त्याचे श्रेय कला दिग्दर्शक सुमित पाटील यांचे आहे. लाडक्या लंबोदराचे सुंदर आणि आगळेवेगळे रूप मूर्तिकार दिनेश सारंग यांनी घडवले आहे.

वटवृक्ष वाचवा, प्राणवायू मिळवा!

श्री स्वामी समर्थांनी ज्या वटवृक्षाखाली साधना-आराधना केली. त्या वडाच्या झाडाचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले आहे. वडाच्या झाडाची पाने 100 टक्के ऑक्सिजन देत असल्यामुळे याला वॉकिंग ट्रीसुद्धा म्हटले जाते. वडाची झाडे आता कमी होत चालली आहेत, त्या झाडाचे संवर्धन आणि जतन करण्याचे आवाहनदेखील मंडळाने केले आहे.