ग्राहकांचे डेबिट कार्ड क्लोन करून पैशांची लुटमार,टिळकनगर पोलिसांनी टोळी पकडली

35

सामना ऑनलाईन, मुंबई

ग्राहकाने बिल भरण्यासाठी दिलेल्या कार्डचे अवघ्या काही सेकंदांत क्लोन करून बनावट डेबिट कार्डच्या आधारे तीन लाखांची लुटमार करणारी चारजणांची टोळी टिळकनगर पोलिसांच्या हाती लागली आहे. टोळीच्या म्होरक्याच्या घरातून पोलिसांनी एक लाखाची रोकड, लॅपटॉप, स्किमर, क्लोनिंग मशीन, नऊ एटीएम कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे.

कुणाल शेठ (35) हा व्यावसायिक चेंबूरच्या एका बारमध्ये नियमित जायचा. 30 जुलैच्या रात्री कुणाल बारमध्ये दारू प्यायला. बिल भरण्यासाठी त्याने मॅनेजर महेश गोंडा (35) याच्याकडे एटीएम कार्ड स्विप करण्यासाठी दिले. महेशने मेन्यू कार्डमध्ये लपवून आणलेल्या स्किमरमध्ये कार्डचा डाटा चोरला. तसेच त्याने पिन नंबर देखील मिळवला. मग टोळीचा म्होरक्या नौशाद रहीम आलम (32) याने त्या चोरलेल्या डाटाच्या आधारे बनावट कार्ड बनवले. त्यानंतर अरुणकुमार महंतो (34) याने त्या कार्डच्या आधारे विविध ठिकाणांहून एक लाखाची रोकड काढली. तसेच दोन-तीन ज्वेलर्सच्या दुकानांतून दीड लाखाची दागिन्यांची खरेदी केली. आपल्या कार्डवरून  तीन लाखांची अफरातफर झाल्याने कळताच कुणालने टिळकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील काळे, उपनिरीक्षक अमोल अंबवणे, अंमलदार जनार्दन झेंडे, संतोष धनावडे, केशव तकीक, कृष्णा मांडवकर या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला अरुणचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मग त्याचे साथीदार नौशाद महेश, सालेम यांच्या मुसक्या आवळल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या