
शहरातील भिस्तबाग महाल, सावेडी परिसरात दरोडय़ाच्या तयारीत असलेली छत्रपती संभाजीनगर येथील तिघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. या कारवाईत मोटार, 13 मोबाईल, तलवार, लाकडी दांडके असा 4 लाख 78 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संतोष अशोक कांबळे (वय 24, रा. साठेनगर, वाळूंज पंढरपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), रविंद्र बापू चव्हाण (वय 23, रा. कमलापूर रोड, वाळूंज पंढरपुर, जि. छत्रपती संभाजीनगर), रवी आबासाहेब बोरूडे (वय 23, रा. समता कॉलनी, वाळूंज पंढरपुर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर ओंकार रोडे, अकबर नासीर शेख (दोघे रा. वाळूंज पंढरपुर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
नगर शहरातील भिस्तबाग महालाजवळ 5 ते 6 इसम अंधारात लाल रंगाच्या मोटारीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीने दबा धरून बसल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार आहेर यांनी गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस पथकाने सापळा रचला. याची माहिती मिळताच टोळीतील दोघे फरार झाले. पोलिसांनी मोटारीत बसलेले संतोष कांबळे, रविंद्र चव्हाण, रवी बोरूडे यांना ताब्यात घेतले. तिघांची तपासणी केली असता तलवार, लाकडी दांडके, 13 मोबाईल आढळून आले. तर ओंकार रोडे, अकबर नासीर शेख हे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ताब्यात घेतलेल्या तिघांविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कांबळे व रवी चव्हाण हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, विजय वेठेकर, संदीप पवार, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, संतोष लोंढे, संदीप दरंदले, फुरकान शेख, आकाश काळे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.