शिक्षक भरती परीक्षेत गुण वाढवून देणाऱ्या टोळ्या

45
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

 सामना प्रतिनिधी । पुणे

राज्यांतील शाळांमधील शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणीत गुण वाढवून देणाऱ्या टोळ्या सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. निम्मे पैसे अ‍ॅडव्हान्स द्या आणि गुण वाढल्यानंतर निम्मे पैसे देण्याची ऑफर देणारे ऑडिओ क्लिप व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने शिक्षक भरती परिक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. तब्बल १ लाख ९७ हजार जणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले. प्रत्यक्षात १ लाख ७१ हजार जणांनी ही परीक्षा दिली. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील विद्यार्थी हे गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालात आणि परीक्षा झाल्यावर झालेल्या निकालातील गुणांमध्ये १ ते २० गुणांपर्यंत फरक असल्याने या विद्यार्थ्यांना निकालाची प्रत मिळाली नाही. परिणामी निकालाबद्दल संभ्रम आहे.

या पार्श्वभूमीवर बी.एड् आणि डी.एड् झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना चाचणीत गुण वाढवून देण्यासाठी गेली काही दिवस ऑफर येत आहेत. त्यासाठी टोळ्या कार्यरत झाल्या असून, गुण वाढवून देण्यासाठी सौदे होत आहेत. गुण वाढवून देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या परीक्षेबद्दल संभ्रम निर्माण झाला असून, ही परीक्षा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुण वाढविण्यासाठी पैशांची मागणी होत असून, निम्मा अ‍ॅडव्हान्स आणि काम झाल्यावर निम्मे पैसे देण्याचा फॉर्म्युला सांगितला जात आहे.

क्लिपमध्ये अधिकाऱ्यांची नावे
या ऑडिओ क्लिपमध्ये शिक्षण विभागातील अधिकारी परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांची नावे घेतली गेल्याने त्यांचे गांभीर्य वाढले आहे. हे बघता या परीक्षांचा निकाल पीडीएफ आणि हार्ड कॉफीमध्ये घोषित करण्याची मागणी विद्याथ्र्यांनी केली असून, या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी, असा पवित्रा परीक्षार्थ्यांनी घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या