नाताळच्या सुट्टीत घरे फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सामना ऑनलाईन । मुंबई

भाड्य़ाने खोली घ्यायची, एखाद्या रिक्षावाल्याला सोबत घ्यायचे आणि मुंबईभर रेकी करायची. अशा प्रकारे नाताळच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या मुंबईकरांची घरे फोडणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून दरोड्य़ाच्या साहित्यासह त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाखांचा ऐवज जप्त केला.

मालाडच्या पूर्वेकडील स्कॉटर्स कॉलनीमध्ये काहीजण घर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनःश्याम नायर, उपनिरीक्षक राजाराम पाटणे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. या पथकाने मोठ्य़ा शिताफीने इफ्तिकार अन्सारी, मोहम्मद शादाब नजाकत हुसेन, फय्याझ अन्सारी, वासीम अन्सारी या चौघांना पकडले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच चोरीचा सुमारे दोन लाखांचा ऐवज जप्त केला. हे चौघेही सराईत गुन्हेगार असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

भाड्य़ाची खोली आणि रिक्षा पण!
घरफोडी करणाऱ्या या टोळीने मालवणी येथे एक खोली भाड्य़ाने घेतली होती. एका रिक्षावाल्याला आपल्या टोळीत घेतले होते. या रिक्षातून दहिसर ते माहीमपर्यंत ते रेकी करायचे. विशेष म्हणजे सुट्ट्य़ांमध्ये बंद असलेली घरे हेरून ती फोडायचे असे समोर आल्याचे दिंडोशी पोलिसांनी म्हटले आहे.

दरोड्य़ाच्या तयारीत असलेल्या पाचजणांना पकडले
दादर पश्चिमेकडील रेल्वे फुटओव्हर ब्रिज येथे दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना क्राइम ब्रँच युनिट-५च्या पथकाने अटक केली. नुमन शेख, साजीद खान, मेहबूब शेख, आसिफ शेख आणि इसाक शेख अशी या पाच जणांची नावे असून त्यांच्यावर मुंबई रेल्वे पोलिसांसह जयपूर, राजस्थान या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या