अभियंता तरुणीवर मित्रांचा सामूहिक बलात्कार

60

सामना प्रतिनिधी । बदलापूर

मुंबई, विक्रोळी येथे कामाला असलेल्या अंकिता सुनील कनोजिया (२२) या अभियंता असलेल्या तरुणीवर अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात तिच्या मित्रासह त्याच्या जोडीदाराने सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह बॅगेत भरून तो बेळगावच्या हद्दीत फेकून दिला. गुन्ह्य़ात जी कार वापरली होती त्याच्या चालकामुळे हा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्या शरण आलेल्या दोन तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.

निकलेश पाटील (२४), रा. नागपूर चिखली हा तिचा मित्र असल्याने २ दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी मुंबई येथे आला. निकलेश याचा मित्र अक्षय वालोदे (२५) हा मूळ नागपूर येथील राहणारा असून तो अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात ‘स्क्वेअर हाइटस्’मध्ये राहतो. निकलेश हा त्याचा नागपूर येथील मित्र नीलेश याला आपल्यासोबत घेऊन त्याची चारचाकी गाडी घेऊन तो मुंबई येथे अंकिता हिला भेटायला गेला होता. तिला फिरायला नेण्याचा बहाणा करीत त्याने त्या गाडीतून तिला मित्र अक्षय याच्या रूमवर पालेगाव येथे आणले. त्याठिकाणी निकलेश व अक्षय या दोघांनी आळीपाळीने अंकिता हिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यावर तिने त्या दोघांना आपण पोलीस ठाण्यात तक्रार करू असा दम दिला. तिने या घटनेबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून त्या दोघांनी तिचे तोंड दाबून तिला जीवे ठार मारले.

आपली प्रतिक्रिया द्या