एटीएम कार्डचे क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

65

सामना प्रतिनिधी, मुंबई

ग्राहकांनी हॉटेल, बारमध्ये बिल भरण्यासाठी कार्ड दिल्यानंतर ते वाऱ्याच्या वेगाने क्लोन करणारी टोळी टिळकनगर पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आरोपींचे नवे कारनामे समोर आले आहेत. टोळीचा म्होरक्या नौशाद जेमतेम आठवीपर्यंत शिकलेला असून डेबिट, क्रेडिट कार्ड क्लोन करण्याचे धडे त्याने यू टय़ूबवरून घेतल्याचे समोर आले आहे.

शिवाजीनगर येथे राहणारा नौशाद व्यवसायाने टेलर आहे, पण टेक्नोसॅव्ही असलेल्या नौशादला यू टय़ूबवर डेबिट कार्ड क्लोनिंग कसे करायचे याचे धडे मिळाले. त्याने कार्ड क्लोनिंगचा बारकाईने अभ्यास केला. मग त्याने नापतोलवरून स्किमर, चार्जर तसेच क्लोनिंग करण्यासाठी लागणाऱया साहित्यांची ऑनलाइन खरेदी केली. मग नौशादने त्याचे गाववाले महेश गोंडा, मोहम्मद सालेम, अरुण महंतो या तिघांना हाताशी घेतले. त्यांना झटपट पैशांचे लालच दाखवून डेबिट, क्रेडिट कार्ड क्लोनिंग करून त्याआधारे लोकांचे पैसे एका क्षणात आपल्या खात्यात वळते करायची आयडिया दिली. मग अरुण कार्ड क्लोनिंगचे साहित्य पुरवायचे काम करू लागला. महेश बारमध्ये येणाऱ्या ग्राहकाच्या कार्डचा डाटा चोरू लागला.

नौशाद चोरलेल्या डाटावरून बनावट कार्ड बनवू लागला. अखेर अरुण एटीएममधून पैसे काढायचे तसेच दागिने खरेदी करायचे काम करू लागला. अशा प्रकारे या टोळीने अनेकांना लुटल्याचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक अमोल अंबवणे यांनी सांगितले.

summary- gang who did cloning of atm cards got arrested

आपली प्रतिक्रिया द्या