मुख्यमंत्र्यांसोबत झळकला कुख्यात गुंडाचा फोटो

मिंधे गटातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शहरातील चौकाचौकात एका कुख्यात गुंडाचे फोटो झळकल्याने कोल्हापुरात आज खळबळ उडाली. कोल्हापूरकरांकडून याचा निषेध करण्यात आल्यानंतर वाढदिवसापूर्वीच राजेश क्षीरसागर यांच्यावर हे पोस्टर हटविण्याची वेळ आली. दरम्यान, गुंडगिरीचे उदात्तीकरण आणि नको ते शक्तिप्रदर्शन करण्याच्या नादात राजेश क्षीरसागर यांची प्रतिमा डागाळल्याचीच चर्चा कोल्हापूर शहरात सुरू होती.

शहर विद्रूपीकरणाचे नियम पायदळी तुडवत राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात प्रत्येक चौकात आणि विद्युतखांबांना शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आहेत. मुख्य चौकातही भलेमोठे फलक लावण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह खून, मारामारी, सावकारी प्रकरणातील गुंड व मोक्कांतर्गत कारवाईतील अमोल भास्कर याचा फोटो लावण्यात आला होता. यातून त्या गुंडाला सामाजिक कार्यकर्ते ही उपाधी लावत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्याची उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागली होती.

शुभेच्छा देण्यासाठी एखादी चारित्र्यवान व्यक्ती मिळाली नाही काय? खुनातील संशयित आरोपी, सावकारी, अपहरण, लुटमार यासारख्या गंभीर गुह्यात अमोल भास्कर याच्यावर गुन्हे दाखल असतानादेखील कोणाच्या पाठिंब्याने शहरात हे फलक लावले? यासह हेच ते सर्वसामान्यांचे सरकार म्हणायचे काय, असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पोलीस प्रशासनावरही टीका

होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी आपापल्या हद्दीतील हे वादग्रस्त फलक हटविण्यास भाग पाडले. गुंड अमोल भास्कर याने हे फलक हटवू नये यासाठी क्षीरसागर यांच्या कार्यालयात ठाण मांडण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचेही या वादग्रस्त फलकांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून दहशत माजविण्याचा प्रयत्न

खून, मारामारी, सावकारी प्रकरणातील गुंड व मोक्कांतर्गत कारवाईतील अमोल भास्कर याला सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढे आणणारे हे मुख्यमंत्र्यांसोबत फोटो असलेले फलक लावणे म्हणजे दहशत माजविण्याचाच प्रकार असल्याची उलट-सुलट चर्चा होऊ लागल्याने अखेर पोलिसांनीच हे फलक उतरवायला लावले.

सायंकाळी पुन्हा फलक लावले; पोलिसांकडून उशिरापर्यंत कारवाई नाही

दुपारी उतरवलेले हे फलक काही चौकात सायंकाळी पुन्हा लावण्याच्या हालचाली सुरू होत्या. कावळा नाका चौकात पुन्हा त्या गुंडाचा फलक लावण्यात आल्याने कायद्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्याशी प्रसारमाध्यमांकडून संपर्क साधला असता पुन्हा हा फलक हटवण्याचे आशासन देण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत काहीच कारवाई झाली नसल्याने शहरात ‘गुंडाराज’ निर्माण झाले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.