गँगस्टर रवी पुजारीला 7 मार्चपर्यंत कोठडी

327

खून, खंडणी यासारख्या गंभीर गुह्यांत वॉण्टेड असलेल्या गँगस्टर रवी पुजारी याला मुसक्या आवळून अखेर हिंदुस्थानात सोमवारी आणले. सेनेगलमध्ये सुरक्षा यंत्रणांनी पकडल्यानंतर पुजारीला बंगळुरू पोलीस कर्नाटकात घेऊन आले. त्याला बंगळुरू येथील कोर्टात हजर केले असता 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

साऊथ आफ्रिका पोलीस आणि सेनेगल सिक्युरिटी एजन्सी यांनी संयुक्त मोहीम राबवत सेनेगलमध्ये रवी पुजारीच्या मुसक्या आवळल्या. रवी पुजारी सेनेगलमध्ये पकडला गेल्याचे कळताच कर्नाटकचे अपर पोलीस महासंचालक अमरकुमार पाण्डये आणि बंगळुरूचे सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पुजारीला हिंदुस्थानात आणण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सेनेगलला धाव घेतली. रवी पुजारीच्या प्रत्यार्पणाच्या आवश्यक बाबी पूर्ण केल्यानंतर त्याला आज एअर फ्रान्सच्या विमानाने बंगळुरूमध्ये आणण्यात आले. रवी पुजारी पकडला गेल्यामुळे व्यावसायिक, बॉलीवूड कलावंत, बिल्डर आदींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रवी पुजारी याच्यावर कर्नाटकासह गुजरात आणि महाराष्ट्रात 100हून अधिक गंभीर गुह्यांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या