यावर्षी गणेशोत्सवात ववसा साजरा होणार, वाचा ववसा म्हणजे काय?

1171
vavasa

सामना प्रतिनिधी । संगमेश्‍वर

यावर्षीच्या गणेशोत्सवातील गौरी पूर्वा नक्षत्रात येणार असल्याने नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना ववसा (ओवासणे) हा पारंपरिक विधी करावा लागणार आहे. परिणामी यासाठी आवश्यक असणार्‍या सुपांच्या खरेदी विक्रीला तालुक्यात जोर चढला असून एक ववसा (छोट्या मोठ्या सुपांचा संच) 1200 ते 1500 रुपयांना विकला जात आहे.

या प्रथेसाठी बांबूच्या बिळशांपासून वळलेली 5 सुपे आवश्यक असतात. यातील 3 सुप मोठी तर 2 छोटी असतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनीने लग्नानंतर पहिल्या पूर्वा नक्षत्रात ववसा करायचा असतो. यासाठी 5 सुपांमध्ये विविध प्रकारची फळे, सौभाग्याच लेणं, तांदूळ, ओटी आदी विविध प्रकारचे पूजा साहित्य मांडून ही सुपं गौरीसमोर ठेवून त्याचे मनोभावे पूजन करायचे आणि गौरीला नैवेद्य दाखवायचा. याचे पूजन झाल्यावर सर्वांनी या सुपांचे दर्शन घ्यायचे असा प्रघात आहे. लग्नानंतर पहिल्याच वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्यास हा सण साजरा होतो नंतर याचे स्वरूप घरगुती केले जाते.

ववसा या प्रकारासाठी लागणारी बांबूची सुपं वळप करून घट्ट विणीने तयार करणारे कारागिर फारच कमी झाले आहेत. नव्या पिढीमध्ये याबाबत फारशी आवड नसल्याने आजही वयोवृद्ध मंडळीच हे काम करताना दिसतात. हा प्रकार म्हणजे वळप कारागिरांसाठी हक्काचा रोजगार असून संगमेश्‍वर तालुक्यातील शिवने, तेर्‍ये, बुरंबी या गावांमध्ये बांबूचे वळपकाम करणारे कारागिर मोठ्या प्रमाणावर आहेत. हे काम खुप कठीण आणि वेळकाढू असते. ज्या वर्षी गौरींचे आगमन पूर्वा नक्षत्राला होते त्याच वर्षी या सुपांची मागणी वाढते आणि यातून या कारागिरांना चांगला व्यवसाय मिळतो.

यावर्षीच्या गणेशोत्सवातील गौरीही पूर्वा नक्षत्रालाच येत असल्याने यावर्षीच लग्न झालेल्या सुवासिनींचा ववसा साजरा होणार आहे. यासाठी आत्तापासूनच संगमेश्‍वर आणि देवरुख बाजारपेठेत ववशाच्या सुपांची जोरात विक्री सुरू असून सध्या 5 सुपांच्या एका ववशाची विक्री 1200 ते 1300 रुपयांना सुरू आहे. चाकरमानी गावी दाखल झाल्यानंतर ऐनवेळी हे ओवसे 1500 ते 1700 रूपयांनाही विकले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या