बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज!

42

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या ११ दिवसांपर्यंत मुंबईत बाप्पाने गणेशभक्तांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज १२ व्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पा निरोप घेणार आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी पोलीस, पालिका, अग्निशमन दल आणि यांच्यासह स्वयंसेवी संस्थांनी जय्यत तयारी केली आहे. पोलिसांचे ४० हजारांपेक्षा जास्त तर पालिकेचे ९ हजार कर्मचारी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही बाप्पाचे विसर्जन सुखकर होण्यासाठी योगदान देणार आहेत. मुंबईकरांनीही शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सर्व यंत्रणांतर्फे करण्यात आले आहे.

पालिकेचे ९ हजार कर्मचारी तैनात

पालिकेचे ९ हजार कर्मचारी-अधिकारी उद्याच्या विसर्जनासाठी रस्त्यावर उतरणार असून गिरगाव चौपाटीसह अन्य ६९ विसर्जन स्थळी जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जेसीबी मशीन, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्रीदेखील विसर्जनाच्या वेळेपर्यंत तैनात करण्यात आली आहे. चौपाटीवर येणारी वाहने, ट्रॉली रेतीत अडकू नये व विसर्जन सुरळीतपणे पार पडावे याकरिता चौपाटीवर ८४० जाड लोखंडी फळ्या (स्टील प्लेट्स) ठेवण्यात येतात. परंतु या वर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचाऱयांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी एका नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

बेस्टच्याही विशेष सुविधा

‘बेस्ट’द्वारे खांबांवर उंच जागी लावण्यासाठी सुमारे १९९१ दिवे (फ्लड लॅण्टर्न) व १३०६ शोधदीप (सर्च लाईट)ची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही काळजी घ्या

 • खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका.
 • भरती व ओहटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱयांवर लावण्यात आली आहे. ती समजून घ्या.
 • गणेशमूर्ती विसर्जनाकरिता शक्यतो तराफे, महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
 • मोठय़ा गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरिता समुद्रात जाणाऱया मंडळाच्या कार्यकर्यांनी शिरगणती करून जावे.
 • पालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाऊ नका.
 • विसर्जन करतेवेळी पाण्यात गमबूट घालावेत.
 • मद्यप्राशन करून समुद्रकिनाऱयावर विसर्जन स्थळी जाऊ नये. कारण अशा व्यक्तीवर मस्त्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.

मत्स्यदंश झाल्यास

 • समुद्रातून बाहेर आल्यावर आपणास मत्स्यदंश झाल्याचे जाणवल्यास तत्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावणे.
 • माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपडय़ाने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
 • मत्स्यदंश झाल्याने घाबरून न जाता पालिकेच्या समुद्रकिनाऱयावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामूल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करून घ्यावी.

पालिकेची तयारी

 • कर्मचारी ९ हजार
 • विसर्जन स्थळे – ६९
 • कृत्रिम तलाव – ३२
 • छोटय़ा गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी – ५० जर्मन तराफा
 • जीव सुरक्षारक्षकांसह जर्मन तराफे – ६०७
 • बोटी – ८१
 • निर्माल्य कलश – २०१
 • निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी – १९२ कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर, डंपर
 • निरीक्षण कक्ष – ५८
 • निरीक्षण मनोरे – ४८
 • प्रथमोपचार केंद्र – ७४
 • मोबाईल टॉयलेट्स – ११८
 • निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिका – ६०

गणेश विसर्जन दिनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जनप्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, श्री गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे, जेणेकरून अप्रिय घटना टाळता येतील. विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहनही मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संयुक्तपणे केले आहे.

शिवसेनेतर्फे पुष्पवृष्टी

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शिवसेना प्रवक्ता, नगरसेवक अरविंद भोसले यांच्यातर्फे वरळीतील सासमिरा, पेट्रोल पंप, डॉ. ए. बी. रोड येथे पृष्पवृष्टी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पावसाळ्यातील साथीचे आजार आणि अवयवदान याबाबत जागरूकतादेखील करण्यात येणार आहे.

वाहतुकीची चोख व्यवस्था

वाहतूककोंडी तसेच विसर्जन मिरवणुकांना अडथळा नको यासाठी वाहतूक पोलिसांनीदेखील वाहतुकीचे नियमन केले आहे.

 • वाहतूक शाखेतील ३६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत
 • ५०० ट्रफिक वॉर्डन आइन स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचा समावेश
 • ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
 • ५४ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत
 • ९९ ठिकाणी नो-पार्किंग झोन
 • गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडी मशीद वांद्रे, जुहू चौपाटी, गणेश घाट-पवई या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष
 • बंद पडलेली वाहने उचलण्यासाठी लहानमोठय़ा क्रेन्सची व्यवस्था.

 

आपली प्रतिक्रिया द्या