गणपतीपुळेचा बाप्पा स्मार्ट फोनवर, लाइव्ह दर्शनासाठी मोबाईल अॅप

173

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेच्या बाप्पाचे भाविकांना आपल्या स्मार्टफोनवर दर्शन घेता येणार आहे. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिर संस्थानने मोबाईल अॅप तयार केले असून या अॅपद्वारे दर्शनासह बाप्पाच्या आरत्या, अभिषेक लाइव्ह अनुभवता येणार आहे.

गणपतीबाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशविदेशातून भाविक येत असतात. या भाविकांसाठी श्रीदेव गणपतीपुळे मंदिर संस्थानने मोबाईल अॅप तयार केले आहे. या मोबाईल अॅपद्वारे आता गणपतीबाप्पाचे दर्शन मंदिरातील आरत्या आणि अभिषेक करता येणार आहे. गणपतीपुळे मंदिर आता हायटेक झाले असून बाप्पाचे दर्शन आता लाईव्ह होणार आहे. या मोबाईल अॅपचा शुभारंभ नामवंत गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते करण्यात आला.

गणपतीपुळे मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव सुरू आहे. या गणेशोत्सवातच श्रीदेव गणपतीपुळे मंदिर संस्थानने तयार केलेला गणपतीपुळे मंदिर या मोबाईल अॅपचा शुभारंभ नामवंत गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे उपस्थित होते. गणपतीपुळे मंदिर मोबाईल अॅपच्या माध्यमातून गणपतीबाप्पाचे लाईव्ह दर्शन भाविकांना होणार आहे. तसेच दररोज सकाळ संध्याकाळी होणाऱ्या आरत्याही मोबाईल अॅपद्वारे ऐकता येणार आहेत. तसेच मंदिरातील पुजा, अभिषेक आणि देणगी या अॅपद्वारे देता येणार आहे. या अॅपमध्ये मंदिराविषयी माहिती, छायाचित्रे, भक्तनिवासाची माहिती, अथर्वशिर्ष अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. गणपतीपुळे मंदिर या नावाने सर्च करुन भाविक हे मोबाईल अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करु शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या