गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या अकरा पर्यटकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले

883

गणपतीपुळे समुद्रकिनारी शुक्रवार दुपारनंतर बुडत असलेल्या 11 पर्यटकांना जीवरक्षकांनी जीवाची बाजी लावून वाचवले. धोकादायक समुद्राबाबत वारंवार सूचना देऊनही गणपतीपुळे येथील समुद्रात पोहोण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. पर्यटक बुडण्याच्या आज तीन घटना घडल्या. पहिली घटना घडल्यानंतरही कोणालाही शहाणपण सुचले नाही. त्यानंतर दोन वेळा पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या.

दिवाळीची सुट्‌टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळ्यात आले आहेत. गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत. गणपतीपुळे समुद्रकिनारा धोकादायक असूनही पर्यटकांना पोहोण्याचा मोह आवरता येत नाही. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रत्नागिरीतून आलेले तीन पर्यटक गटांगळ्या खाऊ लागले. या तिघांना वाचवल्यानंतर पाठोपाठ चार वाजता कर्जत आणि बदलापूरहून आलेले पाच पर्यटक बुडाले. कर्जतहून आलेले प्रणय भिसे (18), दिपक हरडकर (70), विजय भिसे (27), भाले भिसे (27), विकास भिसे (24) हे पाचजण पोहायला गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले.

जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात उड्या मारून या पाचही पर्यटकांना वाचवले. या दोन घटना ताज्या असतानाच सायंकाळी पाचच्या सुमारास संभाजीनगर, नाशिक, हिंगोलीहून आलेले तीन पर्यटक अशाच प्रकारे बुडू लागले. मनिष सोनावणे ( 31, रा.संभाजीनगर), महेश जाधव (39, रा.नाशिक), विशाल शिंदे (19 रा.हिंगोली) हे तिघेजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पुन्हा एकदा जीवरक्षकांनी आपला मोर्चा समुद्राच्या दिशेने वळवत या तिघांनाही वाचवले. बचावकार्यात जेटस्की चालक मोमीन खान, चेतन बोरकर , प्रांत बोरकर, नूर खान, होमगार्ड्‌ सुरज शिंदे, रविकांत केतकर, गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक जयेश रेवाळे, संदेश शिंदे, पोलीस श्री.गावीत यांच्यासह जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, ओंकार गावंडकर, मयुरे देवरुखकर, अक्षय माने यांनी अकरा  पर्यटकांचे आज प्राण वाचवले़

आपली प्रतिक्रिया द्या