मसालेदार खमंग… सात्त्विक

208

मीना आंबेरकर

धणे-जिरे मसाला… चवीला खमंग पण सात्त्विक पदार्थांची रुची वाढविणारा….

आपल्या भोजन पद्धतीत चमचमीत भोजनाला फार महत्त्व आहे. आपल्या जेवणात मिळमिळीत अजिबात अपेक्षित नाही. याचे कारण आपण आपल्या जेवणात विविध प्रकारचे मसाले वापरतो. त्यामुळे पदार्थाला मसाल्याचा अंगभूत स्वाद व चव येते. याउलट पाश्चात्य जेवण पद्धतीत तयार पदार्थावर सॉस, जॅम, केचप, मिरपूड किंवा हर्बस घालून चव व स्वाद आणतात. त्यामुळे आपल्या जेवणात मसाल्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आज आपण पाहणार आहोत धणे-जिरे मसाला किंवा कच्चा मसाला. मसाल्याचे जिन्नस न भाजता अथवा तळता, आहे त्या स्वरूपात कुटून अथवा बारीक करून आयत्या वेळी तयार करून ते पदार्थात घातले की त्याच्या नैसर्गिक स्वादामुळे पदार्थाला एक चांगली चव येते. असा मसाला पुलाव, खिचडी, रस्सा भाजी यासाठी किंवा कचोरी, पॅटीस यांसारख्या चटपटीत पदार्थासाठी वापरतात. याचे साहित्य आपण बघूया.

dhane-jire-masala

साहित्य…अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, एक चमचा शहाजिरे, दालचिनीचे पाच तुकडे, आठ लवंगा, पाच वेलची, अर्धा चमचा काळे मिरे, खोबऱयाची अर्धी वाटी.

कृती…खोबरे सोडून सर्व जिन्नस उन्हात वाळवून घेऊन कुटून मसाला करावा. हाच मसाला भाजीसाठी वापरायचा असल्यास खोबरे भाजून घेऊन इतर जिन्नसांबरोबर कुटावे. आता हा मसाला वापरून केलेल्या काही पाककृती पाहूया.

pulav-1

भाज्यांचा पुलाव

साहित्य…३ वाटय़ा बासमती तांदूळ, अर्धी वाटी गाजराचे बारीक चौकोटी तुकडे, अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी, अर्धी वाटी बारीक चिरलेले बटाटय़ाचे चौकोनी तुकडे,१ वाटी उभा चिरलेला कांदा, १ वाटी मटारचे दाणे, २५ ग्रॅम काजू तुकडा, २५ ग्रॅम बेदाणे, २ चमचे कच्चा मसाला,२ तमालपत्रे, १ चमचा साखर व थोडे मीठ.

कृती…तांदूळ धुऊन ठेवावे. ७ वाटय़ा पाणी घेऊन त्यात कच्चा मसाला घालून चांगले ढवळून घ्यावे. पाणी थोडे आटू द्यावे. नंतर हे पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी ६ वाटय़ा असावे. थोडय़ा तुपावर लवंग, वेलची व दालचिनी घालून फोडणी करावी. त्यावर तांदूळ परतून काढावे. त्यात मसाल्याचे पाणी, मीठ व साखर घालून भात करून घ्यावा. भाताची वाफ जिरली की भात ताटात काढून ठेवावा. बटाटे, गाजर, काजू, बेदाणे वेगवेगळे तळून घ्यावे. फरसबी व मटारचे दाणे, थोडे मीठ व चिमूटभर सोडा घालून वाफवावे. सोडा घातल्यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार राहतो. रुंद पातेल्यात भाज्यांचे व भाताचे थर द्यावेत. अगदी वरच्या बाजूला काजू बेदाणा घालावा. मंदाग्नीवर भाताला वाफ आणावी व गरमच वाढावा.

kachori

मुगाच्या डाळीच्या कचोऱया

साहित्य…१ वाटय़ा मुगाची डाळ, ४ वाटय़ा मैदा, १ चमचा गूळ,१ चमचा कॉर्नप्लॉवर, ४ वाटय़ा गोडे तेल, ३ चमचे कच्चा मसाला, २ चमचे लाल तिखट.

कृती…कचोऱयांच्या पुरणासाठी मुगाची डाळ, २ तास आधी भिजत ठेवा. नंतर कच्चा मसाला व लाल तिखट घालून डाळ जाडसर वाटून घ्या. भांडय़ात वाटलेली डाळ, मीठ व गूळ टाकून थोडे पाणी घालून वाफवून घ्या. नंतर हाताने ती मोकळी करून घ्या म्हणजे पुरण तयार होईल. मैद्यामध्ये २ चमचे तेल, कॉर्नफ्लॉवर घालून मैदा घट्ट भिजवा. चवीपुरते मीठ घाला. त्या पिठाचे लहान लहान गोळे करून हातावर पुरीसारखे करून वाटी तयार करावी. आत डाळीचे पुरण भरून तोंड बंद करून कचोऱया कढईत तेल घालून तळून घ्या.

masala-curry

मासळीचे गोडे

साहित्य…१ वाटी कुठलीही मासळी, २ चमचे कच्चा मसाला, १५ पाकळय़ा लसूण, अर्धा चमचा हळद पूड, अर्धी वाटी ओले खोबरे वाटून, कोथिंबीर, मीठ, ४ आमसुले, चार चमचे लाल तिखट, तेल.

कृती… मासळी साफ करून स्वच्छ धुवावी. कच्चा मसाला, हळद, लाल तिखट व मीठ लावून ठेवून द्यावी. लसणीच्या पाकळय़ा ठेचून घ्याव्यात. पसरट भांडय़ात तेल तापत ठेवून त्यात ठेचलेला लसूण चुरा करून फोडणीला घालावा. लगेच मसाला लावलेली मासळी त्यात टाकावी व पळीने हलवावी म्हणजे रंग येतो. मग चार वाटय़ा पाणी,  वाटलेला नारळ, आमसुले घालावीत. मासळी शिजल्यानंतर कोथिंबीर घालून लगेच उतरवा.

 

आपली प्रतिक्रिया द्या