उरणच्या समुद्रात फिरणार कचरा गिळणारी बोट

71

सामना ऑनलाईन । उरण

कचरा घरातील असो वा रस्त्यावरील, साफसफाईसाठी नेहमी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे तर शाळांपासून ते कार्पोरेट ऑफिसेसपर्यंत सर्वांनीच या मोहिमेत सहभाग घेतला आहे. जमिनीवरील कचरा उचलणे सोपे आहे, पण समुद्रातील कचऱयाचे काय? यासाठी जेएनपीटीने एक पाऊल पुढे टाकले असून अनोखी सागर सफाई मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मल्टिपर्पज युटिलिटी बोट भाडय़ाने घेतली असून ती लवकरच उरणच्या समुद्रात फिरणार होणार आहे. केवळ समुद्रातील कचराच नव्हे तर जहाजांमधून होणारी तेलगळतीदेखील साफ करण्यात येणार असल्याने प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

जेएनपीटी बंदराच्या सागरी क्षेत्रात अनेकदा तेलगळतीचे प्रकार होतात. त्याशिवाय समुद्रात प्लॅस्टिकच्या बाटल्या, लाकडी ओंडके, व अन्य कचरा मोठय़ा प्रमाणावर आढळतो. तो न काढल्याने समुद्राचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जेएनपीटीने त्यासाठी पुढाकार घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तेलगळती, सागरी प्रदूषण तसेच कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष बोटीचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील एसएचएम शिपकेअर कंपनीकडून ही बोट भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.

पायलटलाही होणार मदत

समुद्रातील बोया आणि त्याचे दिवे तपासणी करण्यासाठी डेकवर बोलार्ड व्यवस्था तसेच सागरी सुरक्षा, पायलटसाठीही बोटीची मदत होणार आहे. बंदर स्वच्छ ठेवण्यासाठी व पर्यावरण राखण्याकरिता या बोटीचा निश्चित उपयोग होणार आहे.

–  कॅप्टन कपूर (वरिष्ठ अधिकारी)

बोटीच्या वेगाची क्षमता २० सागरी मैल इतकी आहे. लांबी साडेबारा मीटर असून १२ प्रवासी आणि ४ कर्मचारी अशी एकूण १६ प्रवासी वाहतुकीची क्षमता आहे. या बोटीची बांधणी एफआरपी पद्धतीने केली आहे.

बोटीत ४४८ क्षमतेचे दोन इंजिन बसविण्यात आले आहेत. तेलाचे प्रदूषण रोखणे आणि कचरा साफ करण्यासाठी ५-१० एम-३/स्किमरची क्षमता असलेली यंत्रणा या बोटीत बसविण्यात आली आहे.

समुद्रात पसरणारे तेल गोळा करून ते बाटीतच साठविण्याची प्रणाली बसविण्यात आली असून त्याची क्षमता ५० लिटर ओएसडी इतकी आहे. तसेच या बोटीत समुद्रात वाहून येणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या