सहाव्या दिवशीही कचराकोंडी कायम; मनपा प्रशासनाची धावाधाव

30

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात अभूतपूर्व अशी कचराकोंडी झाली आहे. आंदोलनाचा आज सहावा दिवस असूनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. शहराच्या कचराकोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दखल घेऊन विभागीय आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, वाळूज ग्रामपंचायतीच्या शिवारात खासगी जागेवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वाहनांना खांडेवाडी-नायगव्हाणच्या ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे मनपा प्रशासनाची धावपळ उडाली असून, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

शहरातील कचरा कोंडी सोडविण्यासाठी मनपा प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यात यावा आणि कचरा डेपोवर कचऱ्याचे एकही वाहन येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस असून यावर कोणताही तोडगा काढण्यात मनपासह जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे शहरातील कचरा दिवसेंदिवस वाढत असून तो उचलण्याचेही काम अवघड झाले आहे. सध्या शहरात २ हजार मेट्रीक टनपेक्षा अधिक कचरा साचलेला आहे. कचराकुंडीच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर होत आहेत.

महानगरपालिकेकडून सर्वस्तरावर प्रयत्न केले जात असलेतरी त्यातून मार्ग सापडलेला नाही. सहाव्या दिवशी शहरात कचरा कोंडी कायम आहे. दिवसेंदिवस कचरा कोंडीमुळे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाभूळगाव, चिकलठाणा, मिटमिटा, मुकुंदवाडी या ठिकाणी कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केला. त्यापाठोपाठ आज बुधवारी वाळूज ग्रामपंचायत शिवारात अग्रवाल एजन्सीच्या ३५ एकर जागेवर कचरा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. सकाळी १५ ते २० वाहने कचरा टाकण्यात आला. परंतु शिवारात कचरा डेपो होत असल्याचे कळताच खांडेवाडी-नायगव्हाणचे सरपंच अशोक ढगे व ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला.

हॉटेल्स, मंगल कार्यालयांना नोटिसा, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
शहरातील हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांनी त्यांच्याकडील कचरा आणि उरलेले अन्नपदार्थ कचराकुंडीत न टाकता स्वत:कडील मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यामध्ये टाकण्यात यावय यासाठी महानगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मनपाच्या पाच रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सायंकाळी सुरू करण्यात आला असून आरोग्य केंद्रामार्फत वॉर्डावॉर्डात आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. एन-८ मधील मनपाचे रुग्णालय २४ तास सुरु राहणार असल्यामुळे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच झोपडपट्टी भागात १ लाख मास्कचे वाटप केले जात असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

बायोट्रिट पावडरची कचऱ्यावर फवारणी
शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी मनपाकडून काळजी घेण्यात येत आहे. बायोट्रिट पावडरची तातडीने खरेदी करून आज ही पावडर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फवारण्यात आली आहे. मध्यवर्ती जकात नाका, पदमपुरा, किराडपुरा, सिडको-हडको, सातारा-देवळाई, भावसिंगपुरा, चिकलठाणा, गजानन मंदिर, मुकुंदवाडी, नारेगाव, रोशनगेट, बायजीपुरा, रेल्वेस्टेशन, बसस्थानक यासह कचऱ्याचे ढीग साचलेल्या ठिकाणी बायोट्रिट पावडरची फवारणी करण्यात आली. यामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरणार नाही आणि माशा घोंगावणार नाहीत.

मनपा प्रशासनाकडून निविदा काढण्यास गती मिळेना
महानगरपालिकेने कचरा कोंडी सोडविण्यासाठी तातडीने स्मार्ट सिटी प्रकल्पातून १० कोटी खर्चास मंजुरी घेतली. परंतु मशिनरी खरेदीसाठी निविदा काढण्याचे काम अद्यापही झालेले नाही. नारेगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाचा सहावा दिवस असूनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आयुक्त दीपक मुगळीकर यांनी आंदोलकांना दोन दिवसात निविदा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही कोणतीही हालचाल झालेली नाही.

आयएमए करणार मोफत उपचार
महानगरपालिकेने कचऱ्यामुळे शहरात रोगराई व साथीचे आजार उद्भवू नये म्हणून इंडियन मेंडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेतली. या बैठकीत शहरातील वैद्यकीय उपचार करणारे रुग्णालय, डॉक्टर्स यांना शहरात कचरा कोंडी झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर घोडेले यांनी केले. आयएमएचे नियोजित अध्यक्ष कुलदीपसिंग राहुल, बेंजरगे म्हणाले की, शहरात ४७५ रुग्णालये आहेत. या रुग्णालयात नागरिकांना मोफत सेवा पुरविण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या