दुसऱ्या दिवशीही कचराकोंडी कायम

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरातील कचऱ्याची कोंडी फोडण्यात दुसऱ्याही दिवशी मनपा प्रशासनाला अपयश आले. नारेगाव येथील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी ऐकले नाही. तर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांना ग्रामस्थांनी आमचा ‘धर्मा पाटील’ करू नका, आता कचरा टाकू दिला जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सुनावले. दोन महिन्यात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही धुडकावले. दरम्यान, मनपाने शनिवारी प्रभागातील कचरा प्रभागात जिरविण्याचा प्रयत्न केला, परंतु शहरातील कचराकोंडी कायम आहे.

नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहरात कचरा कोंडी झाली असून मनपा प्रशासनाने प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु ४० टक्के कचरा जिरवता आला असून ६० टक्के कचरा तसाच पडून आहे. शहरातील कचरा टाकण्यासाठी परिसरात सर्वच ठिकाणी विरोध होत असल्यामुळे नारेगाव येथे कचरा टाकण्यासाठी आंदोलकांना विनंती करण्याकरिता आज शनिवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन, राजू शिंदे हे पदाधिकारी गेले. परंतु ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा टावूâ दिला जाणार नाही, असे सांगितल्यामुळे पदाधिकारी परत आले. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी नारेगाव येथे गेले. त्यांच्यासमवेत शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, दीपक कुलकर्णी, घनकचरा प्रमुख विजय पाटील, तहसीलदार सतीश सोनी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे हे अधिकारी उपस्थित होते.

गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
ग्रामस्थांच्या वतीने पुंडलीक अंभोरे म्हणाले, या कचरा डेपोमुळे आमचा विकास खुंटला आहे. जमीनींला भाव नाही, आरोग्य धोक्यात आले असून गावातील मुलांना मुली देण्यास कोणीही तयार नाही. गाव सोडून जाण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तुमचा कचरा आमच्या दारात नको, चाळीस वर्षे आम्ही सहन केले, आमचा धर्मा पाटील करू नका, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा अंभोरे यांनी दिला. एक महिला रॉकेलची कॅन घेऊन पेटवून घेण्यासाठी आली होती. त्या महिलेला अंभोरे यांनी सांगितले की, आपण मरायचे नाही, आता मारायचे. अशी समजूत काढून तिला पाठवून दिले. शेवटी जिल्हाधिकारी राम यांनी ग्रामस्थांना दोन महिन्याची मुदत देण्याची विनंती केली. तुमचा निरोप काय ते कळवावा, असे सांगून अधिकारी निघून गेले.

स्वयंघोषित पुढाऱ्याची चमकोगिरी
नारेगाव येथे आंदोलकांशी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी एका स्वयंघोषित पुढाऱ्याने या आंदोलनाशी त्याचा काहीही संबंध नसताना विनाकरण आंदोलकांना भडकावून देण्याचे भाषण केले. त्यामुळे अधिकारी आणि आंदोलक यांच्यातील चर्चा बिघडली. हा पुढारी आंदोलनात चमकोगिरी करीत असल्यामुळे आंदोलकांनीही नाराजी व्यक्त केली.

दोन महिन्याची जबाबदारी घेतो- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, ग्रामस्थांशी चर्चा करण्यापूर्वी महानगरपालिकेत बैठक घेतली. मनपाने कचरा नष्ट करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन मनपाने तातडीने कार्यवाही सुरू केली. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. हा कचरा नष्ट करण्यासाठी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. गेल्या तीन महिन्यापासून ही तयारी सुरू आहे. दोन महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली. जिल्हाधिकारी म्हणून ही जबाबदारी मी घेत असल्याचे सांगितले.

दोन महिन्यांची मुदत द्या- मनपा आयुक्त
नारेगाव येथे आंदोलकांसमोर भूमिका मांडताना मनपा आयुक्त मुगळीकर म्हणाले, कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी चार महिन्यापूर्वी आंदोलन केले. चार महिन्यात कचरा नष्ट केला जाईल असे महानगरपालिकेने आश्वासन दिले होते. परंतु कार्यवाही करण्यास विलंब झाला. कचरा डेपोतील कचऱ्याचे सर्वेक्षण करण्यात येऊन हा कचरा जागेवरच जिरविण्यासाठी त्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून डीपीआर तयार केला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी स्मार्ट सिटीतून ४७ कोटी खर्च केले जाणार असून मालेगाव येथून २०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागविण्यात आली आहे. दोन महिन्याची मुदत दिली तर हा संपूर्ण कचरा नष्ट केला जाईल. तसेच प्रत्येक प्रभागात मशीन बसवून शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्यामुळे तो कचरा डेपोत पाठविला जाणार नाही. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनीही ग्रामस्थांकडे दोन महिन्याचा वेळ देण्याची मागणी केली. कचऱ्याचा प्रकल्प राबविण्याची सर्व तयारी झाली असून मशिनरी येताच कामाला सुरुवात होईल. त्याकरिता पैशाची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.