कार्ला गडावर महाराष्ट्रातील सीकेपी एकवटणार; शनिवारी ‘एक दिवस कायस्थांचा’

112

सामना ऑनलाईन । खालापूर

लाखो कुटुंबीयांची कुलस्वामिनी असलेल्या कार्ल्याच्या गडावर महाराष्ट्रातील सीकेपी समाज एकवटणार आहे. दीडशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच राज्याच्या विविध भागांत विखुरलेले सीकेपी बांधव प्रथमच एकत्र येणार असून निमित्त आहे ‘एक दिवस कायस्थांचा’ या उपक्रमाचे. यावेळी महापूजा, गोंधळ, महाआरती असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम केले जाणार असून एकवीरा देवीच्या जयजयकाराने कार्ल्याचा गड दुमदुमून जाणार आहे.

महाराष्ट्रात चांद्रसेनिय कायस्थ प्रभू तथा सीकेपी समाज हा शैक्षणिक, सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रात अग्रणी असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाची खाद्यसंस्कृती हे मोठे वैशिष्टय़ असून बाजीप्रभू देशपांडे, भाषाप्रभू राम गणेश गडकरी, चिंतामणराव देशमुख, रंगो बापूजी गुप्ते, जनरल अरुणकुमार वैद्य, कविवर्य शंकर वैद्य, संगीतकार श्रीनिवास खळे आदी अनेक मान्यवरांनी समाजाचे नाव आपल्या कार्याने उज्ज्वल केले.

बसेसची खास व्यवस्था
सीकेपी बांधवांना थेट कार्ला गडावर जाण्यासाठी मुंबई, ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथून बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सीकेपी समाजाने एकत्र यावे व भविष्यात समाजाच्या विकासासाठी काही ठोस उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सीकेपी समाजाचे अध्यक्ष तुषार राजे यांनी सांगितले.

११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कार्ल्याच्या गडावर पायरी पूजन होणार असून देवीची महापूजा केली जाणार आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता खडय़ा आवाजात गोंधळ घातला जाणार आहे.

दुपारी १ वाजता महाआरती होईल. या उपक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. भाऊ सुळे असून महाड सीकेपी संस्थेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख, उद्योजक राजेश देशपांडे, मिलिंद मथुरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेघन गुप्ते, शेखर देशपांडे, नरेंद्र राजे, पुरुषोत्तम फडणीस, विजय देशमुख, संदेश कुलकर्णी, राधिका गुप्ते आदी मेहनत घेत आहेत. ‘एक दिवस कायस्थांचा’ या उपक्रमासाठी भाविकांकरिता दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या