‘अ‍ॅडव्हान्स लीडरशिप’मध्ये गौरव सोमवंशी यांचा सहभाग

72

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जगभरातील नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी केम्ब्रीज विद्यापीठात सुरू असलेल्या दहा दिवसीय ‘अ‍ॅडव्हान्स लीडरशिप’ कार्यक्रमात संभाजीनगर येथील गौरव ज्ञानदीप सोमवंशी सहभागी झाला आहे. यासाठी देशातून फक्त चारच जणांची निवड झाली असून यात गौरव अव्वल ठरला आहे.

केम्ब्रीज विद्यापीठाच्या ‘अ‍ॅडव्हान्स लीडरशिप’साठी ब्रिटिश कौन्सिलने दिल्ली येथे मुलाखती घेतल्या. यात देशभरातून ४५० जणांनी सहभाग घेतला होता. यातून केवळ चारच जणांची निवड झाली असून, सर्वोत्कृष्ट संवाद कौशल्य, सादरीकरण आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीतील नावीन्यपूर्ण संशोधनामुळे गौरव देशात अव्वल ठरला. केम्ब्रीज विद्यापीठात या चौघांसह विविध १५ देशातील विद्यार्थी दहा दिवसांच्या अ‍ॅडव्हान्स लीडरशिप’मध्ये सहभागी झाले आहेत.

गौरव हा कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. ज्ञानदीप सोमवंशी यांचा चिरंजीव असून, गौरवचे पदवीपर्यंतचे शिक्षण संभाजीनगर येथेच पूर्ण झाले आहे. संगणक अभियांत्रिकीची पदवी त्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतली आहे. पुढे त्याने ‘संगणक अभियांत्रिकी’ची पदवी घेतल्यानंतर व्यवस्थापनशास्त्राचे पदव्युत्तर (आयआयएम) शिक्षण लखनौ येथे घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या