घरासमोरच जवळून गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या

53

सामना ऑनलाईन । बंगळुरू

ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आणि लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची बंगळुरूतील राहत्या घराबाहेर दरवाजातच गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने कर्नाटकसह देशभरात हादरा बसला आहे. विविध शहरांमध्ये पत्रकार संघटनांनी देशभरात निषेध करीत निदर्शने केली. सामाजिक, राजकीय पक्षांसह सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून, हत्याकांडाची सखोल चौकशीची मागणी होत आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रातही ऍलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने तपासासाठी विशेष पोलीस पथक (एसआयटी) नेमले आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

काल मंगळवारी रात्री आठच्या सुमारास गौरी लंकेश बंगळुरूतील राजराजेश्वरीनगर येथील आपल्या घरी परत आल्या. कार पार्क करून त्या दरवाजा उघडत असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. गौरी लंकेश यांच्या शरीरातून तीन गोळ्या आरपार गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात त्या कोसळल्या. गोळीबाराच्या आवाजाने शेजारी घराबाहेर आले. त्यांनी गौरी लंकेश यांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

गेल्यावर्षी मानहानीच्या खटल्यात झाली होती शिक्षा
गौरी लंकेश डाव्या विचारांच्या होत्या. त्यांनी संघ, भाजप आणि मोदी सरकारविरुद्ध लंकेश पत्रिकातून अनेकदा लिखाण केले. धारवाड येथील भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दुषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. 2008 मध्ये गौरी यांनी भाजप नेत्यांविरुद्ध लेख लिहिला होता. गेल्यावर्षी न्यायालयाने गौरी यांना सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली होती. गौरी यांना जामिनही मिळाला होता.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक सरकारकडे अहवाल मागितला आहे.

हत्या सीसीटीव्हीत कैद

गौरी लंकेश यांच्या घराबाहेर तीन सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात हे हत्याकांड कैद झाले आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे घातले होते आणि हेल्मेट होती. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

कोण होत्या गौरी लंकेश

ज्येष्ठ पत्रकार 55 वर्षीय गौरी लंकेश या कन्नड भाषेतील लंकेश पत्रिकाच्या संपादिका होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे पत्रकार, कवी, लेखक आणि चित्रपट निर्माते होते. पी. लंकेश यांनी 1980 मध्ये लंकेश पत्रिका साप्ताहिक सुरू केले. कोणतीही जाहिरात न छापता हे साप्ताहिक आजपर्यंत सुरू आहे. वडिलांच्या निधनानंतर 2000नंतर गौरी यांनी संपादकपदाची धुरा सांभाळली. गौरी यांनी भाजप, संघ आणि हिंदुत्ववादीविरोधी भूमिका मांडली. गौरी यांच्या पश्चात बहीण कविता, भाऊ इंद्रेश आणि आई आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पत्रकार गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर आज दुपारी बंगळुरूतील यमाराजपेठ येथील स्मशानभूमीत सरकारी इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार, लेखक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्री यावेळी हजर होते. त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर कोणताही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातही ऍलर्ट

गौरी यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकसह महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, असे कर्नाटकचे पोलीस उपमहानिरीक्षक एम. एन. अणुयेथ यांनी सांगितले. दरम्यान, हल्लेखोरांनी गौरी यांच्या घराची रेकी केली होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयितांकडे चौकशी सुरू आहे.

हुतात्मा चौकात आज आंदोलन

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या दुपारी 1 वाजता मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनासाठी हाक दिली आहे. सर्वच पुरोगामी पक्ष, संघटनांनी या आंदोलनात मोठय़ा संख्येने उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकशाहीचा खूनः एसआयटी चौकशी – मुख्यमंत्री

गौरी लंकेश यांची हत्या हा लोकशाहीचा खून आहे. या निर्घृण हत्याकांडाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल. पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांकडून मारेकऱयांचा शोध घेतला जात आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. गौरी लंकेश यांची हत्या अत्यंत धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच त्या मला भेटल्या होत्या. मात्र, जीवे मारण्याच्या धमकीबाबत त्यांनी काही माहिती दिली नव्हती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची अशीच हत्या झाली होती. दोन्ही हत्याकांडाची पद्धत एकच असल्याचे गौरी यांचे समर्थक आणि मित्र परिवाराचे म्हणणे आहे; पण मुख्यमंत्र्यांनी यावर थेट भाष्य केले नाही. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध आहे का? याचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

कर्नाटकातील सामाजिक कार्यर्त्यांना पोलीस संरक्षण दिले आहे. लंकेश यांच्या हत्याकांडानंतर फेसबुक, वॉट्सऍप या सोशल मिडियावर काही अक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या. त्याचाही तपास सुरू आहे. या पोस्टचा या हत्येशी संबंध आहे का? याचा तपास पोलीस करीत असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

त्या चार हत्या

20 ऑगस्ट 2013ला पुणे येथे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत होते. n 16 फेब्रुवारी 2015ला कोल्हापूर येथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पानसरे हे पत्नीबरोबर मॉर्निंग वॉकला गेले होते.

30 ऑगस्ट 2015ला कर्नाटकात धारवाड येथे ज्येष्ठ लेखक, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची घराच्या दरवाजाजवळच गोळ्या घालून हत्ये केली होती. n आता गौरी लंकेश यांची बंगळुरूत हत्या झाली. चारही हत्याकांड मारेकऱयांनी जवळून गोळ्या घालून करण्यात आल्या आहेत.

देशामध्ये संघ आणि भाजपविरोधात बोलणाऱयांना संपवले जात आहे. जो कोणी संघ आणि भाजपच्या विचारसरणीला विरोध करीत असेल त्याला धमकावले जाते, हल्ला केला जातो आणि प्रसंगी ठारही मारले जाते. या सगळ्यांमागे देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हेच उद्दिष्ट आहे. मात्र ही आपल्या देशाची परंपरा नाही.
– राहुल गांधी (काँग्रेस उपाध्यक्ष)

सोनिया गांधी आणि राहुल यांनी केलेले आरोप बेजबाबदार, बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. अशाप्रकारे असत्य आरोप भाजप आणि पंतप्रधानांवर लावणे हे अन्यायकारक आहे. सरकार, भाजप किंवा पक्षाशी संबंधित कोणत्याही संघटनांचा पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी कसलाही संबंध नाही.
– नितीन गडकरी (केंद्रियमंत्री )

लोकशाहीसाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे. असहिष्णुता देशात वाढत आहे. विचारवंत, पत्रकारांवर हल्ले होत आहेत.
– सोनिया गांधी (काँग्रेस अध्यक्षा)

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी और अब गौरी लंकेश. अगर एकही तरह के लोग मारे जा रहें हैं, तो किस प्रकार के लोग मार रहे हैं?
– जावेद अख्तर (ज्येष्ठ गीतकार)

आपली प्रतिक्रिया द्या