उद्योगपती गौतम अदानींना मोठा फटका; श्रीमंतांच्या यादीतील क्रमांकात झाली घसरण, शेअर्समध्ये पडझड

gautam-adani

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल (हिंडेनबर्ग रिपोर्ट) अदानी समूहाला भारी पडताना दिसत आहे. हा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या (अदानी स्टॉक्स) शेअरमध्ये त्सुनामी आली आहे आणि ते मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकात सध्या चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी अचानक सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

 

गौतम अडाणी यांचे मोठे नुकसान

 

2022 मध्ये जगातील टॉप-10 अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती होते. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात ते यशस्वी झाले, पण नवीन वर्ष 2023 हिंदुस्थानी उद्योगपतींसाठी अत्यंत वाईट ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानी समूहाचे नुकसान होऊ लागले. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत 2.37 लाख कोटी रुपयांनी घटले. यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही $100.4 अब्ज इतकी कमी झाली आहे.

 

फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार, वृत्त हाती येईपर्यंत गौतम अदानी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर घसरले होते. या उलट-सुलट घडामोडींमध्ये वॉरन बफे, बिल गेट्स आणि लॅरी एलिसन, जे दीर्घकाळ गौतम अदानींच्या खाली होते, त्यांच्या वरच्या स्थानावर पोहोचले आहेत.