अदानी यांच्यासोबतची भेट ही टेक्निकल, शरद पवार स्पष्टच बोलले

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांनी पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शरद पवार यांनीच अदानी यांच्यासोबतची भेट ही टेक्निकल मुद्दय़ासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

हिंडेनबर्ग अहवालावरून सर्वच प्रमुख विरोधी पक्ष अदानी उद्योगसमूह आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यातच शरद पवार यांनी गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत पवार यांनी खुलासा केला आहे.

शरद पवार म्हणाले की, ही भेट टेक्निकल होती. सिंगापूर येथील एक प्रतिनिधी मंडळ माझ्याकडे आले होते आणि त्यांना काही टेक्निकल मुद्दय़ांवर उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. यादरम्यान, गौतम अदानी आणि सिंगापूर प्रतिनिधी मंडळ यांच्यात ही बैठक झाली. मात्र हा टेक्निकल मुद्दा होता. त्यामुळे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही.