गौतम गंभीरचा मोठेपणा, घरच्या मोलकरणीचे केले अंत्यसंस्कार

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर हा कायम त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. या रोगाच्या भीतीने लोकं नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसताना गौतम गंभीरने मोठेपणा दाखवत त्याच्या घरातील मोलकरणीचे अंत्यसंस्कार केले आहेत. गौतम गंभीरने याबाबत ट्विट केले आहे.

गौतम गंभीरच्या घरी गेल्या सहा वर्षांपासून काम करणाऱ्या सरस्वती पात्रा यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. पात्रा या मुळच्या ओडीशातून जजपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाातील होत्या. लॉकडाऊनमध्ये त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी पाठवणे शक्य नसल्याने गौतम गंभीरने स्वत: पुढाकार घेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत त्याने ट्विट केले आहे की ‘माझ्या मुलांची काळजी घेणारी व्यक्ती कधीच मोलकरीण असू शकत नाही. त्या घऱातल्याच सदस्य होत्या. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे हे माझे कर्तव्य होते. मी कधीच जात, धर्म, सामाजित परिस्थिती असा भेद केला नाही. चांगल्या समाजाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. हीच माझी हिंदुस्थानची संकल्पना आहे. ओम शांती’,

सरस्वती पात्रा यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना गौतम गंभीरने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच उपचारादरम्यान तो त्यांच्या काळजी घेत होता. 21 एप्रिलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या