कसं शक्यय? आठ वर्षात एकही विजेतेपद नाही तरी कर्णधार, विराटबाबत गौतमचा ‘गंभीर’ सवाल

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. यंदाचा हंगाम हिंदुस्थानमध्ये आयपीएल 2021 साठी प्रत्येक फ्रेंचाईजी ट्रेड आणि रिलीज करत आहेत. अनेक संघांनी बड्या खेळाडूंनाही रिलीज केले आहे. पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टीव्ह स्मिथला डच्चू दिला. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

एकीकडे खराब कामगिरीमुळे स्मिथला डच्चू मिळाला असला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्णधार विराट कोहली याच्यासह अनेक बड्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. गेल्या आठ वर्षांपासून विराट आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अद्याप एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. यावरच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने निशाणा साधला आहे.

‘स्टार स्पोर्टस’चा शो ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये बोलताना गौतम गंभीरने विराट कोहलीच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला. ‘आठ वर्षांपासून विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकदाही ट्रॉफीवर नाव कोरलेले नाही. हा खूप मोठा काळ आहे. मला सांगा असा कोणता कर्णधार आहे, कर्णधार सोडा असा कोणता खेळाडू आहे जो आठ वर्षांपासून एकही विजेतेपद न जिंकता खेळतोय’, असा सवाल गंभीरने उपस्थित केला. तसेच या अपयशाला कर्णधार जबाबदार असतो. मी कोहलीविरोधात बोलत नाहीये, पण विराटने पुढे येऊन यावर उत्तर द्यायला हवे आणि जबाबदारी स्वीकारायला हवी, असेही गंभीर म्हणाला.

दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून तत्पूर्वी सर्वच संघांनी काही खेळाडूंनी ट्रेड केले तर काहींना रिलीज केले. आरसीबीने देखील आपल्या 10 खेळाडूंना रिलीज केले आहे. यात ख्रिस मॉरीस, अॅरॉन फिंच, मोईन अली, इसरू उडाना, डेल स्टेन, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत सिंह मान आणि पार्थिव पटेल यांची नावे आहेत.

आरसीबीने खेळाडूंना रिलीज केल्यानंतर गंभीरने विराट आणि आरसीबीवर निशाणा साधला. आरसीबीची सर्वात मोठी समस्या ही आहे की ते दरवर्षी मोठे बदल करतात. यामुळे खेळाडूंमध्ये कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यांचा खेळ खराब होतो. तसेच दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीस याला रिलीज केल्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे गंभीर म्हणाला. मॉरीसचा यंदाचा हंगाम एवढा काही खराब गेलेला नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली होती, तसेच उमेश यादव यालाही ही गोष्ट लागू होते, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या