देशात रोज बलात्काराच्या 90 घटना घडत आहेत अशी माहिती आता समोर येत आहे. यापैकी गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. बदलापूर, पुणे, कोलकाता, नाशिक, अकोला आणि आता कोल्हापूरमधूनही महिलावरांवर तसेच चिमुकल्यांवरही बलात्कार होत आहे. दरम्यान, बदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. दरम्यान या सगळ्या घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून, रस्त्यावर उतरुन तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला. अनेक कलाकारांनी पोस्ट करून निषेध व्यक्त केला. आता अभिनेत्री गौतमी देशपांडेनेही रोष व्यक्त केलाय.
गौतमी देशपांडेने तिच्या सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. या कवितेतून गौतूमीने सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने माणसाच्या राक्षसी वृत्तीचा, स्त्रीकडे बघणाऱ्या वाईट नजरांचा उल्लेख केला आहे. तसेच या कवितेच्या माध्यमातून तिने प्रत्येक स्त्रीला स्वत:च रक्षण स्वत: करण्याचा संदेश दिला आहे.
काय आहे गौतमीची कविता-
ये तू आता काळजी घे बाई
कारण तुला वाचवायला आता काही कृष्ण येणार नाही
आता तुझी अब्रु झालीये खूप खूप स्वस्त
आजूबाजूला दुर्योधन, दु:शासन झालेत मदमस्त
तुझ्यासाठी आता कुणी भीम प्रतिज्ञा करणार नाही
ये आता तू काळजी घे बाई
आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा
तुला मिळतेय तुझ्याच स्त्रीत्वाची शिक्षा
आता अधर्मासाठी कुणी महाभारत करणार नाही
ये आता तू काळजी घे बाई
तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे
पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे?
आजही तुझ्या निऱ्यांना हात घालायला कुणी घाबरणार नाही
आता तू काळजी घे बाई
तू कपडे कोणतेही घाल
त्यांच्या लेखी तू वस्रहिन
अब्रू रक्षणासाठी कुणाकुणापाशी होशील लीन?
आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही
आता तू काळजी घे बाई
काळ पुढे गेला माणूस नाही
धर्म बदलत गेला पण वृत्ती नाही
आजही भर सभेत लाज तुझीच जाईल
ये आता तू काळजी घे बाई
सितेला नेली पळवून तेव्हा राम आला होता धावून
द्रौपदीच्या निऱ्यांना हात घातला तेव्हा कौरवांनी केला पांडवांचा नि:पात
पण आज तुझा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार
तुला आता देवाचीही साथ राहिली नाही
तू आता काळजी घे बाई
आता वेळ बदलायची
स्वत:हून महाभारतात उतरायची
दुर्योधनाची मांडी आता स्वत:हून फोडायची
आता केस बांध, युद्धात उतर बाई
कारण आता तुला वाचवायला कृष्ण काही येणार नाही
View this post on Instagram