‘गे’ असल्याने सक्तीच्या सैन्य सेवेपासून सुटका करवून घेतली, सावत्र भावाने तरुणाचं मुंडकं छाटलं

इराणमध्ये अलीरेझा मोनफारेद नावाच्या 20 वर्षांच्या तरुणाचा खून करण्यात आला होता. हा खून त्याचा सावत्र आऊ आणि चुलत भावांनी मिळून केल्याचं उघडकीस आलं आहे. अलीरेझा हा समलिंगी होता आणि त्याच्या वर्तणुकीमुळे त्याचा सावत्र भाऊ पूर्वीपासून नाराज होता. अलीरेझा बाकी पुरुषांपेक्षा वेगळे आणि विचित्र कपडे घालत होता असा त्याच्या भावाचा आरोप होता. अलीरेझामुळे आपल्या कुटुंबाला मान शरमेने खाली घालावी लागत असल्याचं त्याचं मत होतं.

मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास अलीरेझाने त्याच्या आईला फोन केला होता. याच सुमारास त्याचा सावत्र भाऊ त्याच्या घरी आला होता. वडिलांनी बोलावलं असल्याचं सांगून त्याने अलीरेझाला घरातून नेलं होतं. सावत्र भावाने अलीरेझाला बोरुमी नावाच्या भागाच्या दिशेने नेलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलत भाऊ देखील होते. अलीरेझाचा सावत्र भाऊ आणि दोन चुलत भावांनी त्याचा वाटेतच खून केला. त्याचं मुंडकं धडावेगळं करत धर झाडीझुडपांत फेकून दिलं. बुधवारी उशिरापर्यंत अलीरेझाचा थांगपत्ता न लागल्याने त्याच्या घरचे काळजीत पडले होते. यावेळी त्याच्या सावत्र भावाने अलीरेझाच्या आईला फोन करून आपण त्याची हत्या केली असल्याचं सांगितलं.

अलीरेझा आणि त्याच्या सावत्र भावामध्ये सतत खटके उडायचे. अलीरेझा ज्या पद्धतीने वागायचा ते त्याच्या भावाला पसंत नव्हतं. इराणमधील तरुणांना सक्तीची सैन्य सेवा करावी लागते. समलिंगी असल्यास यातून सवलत मिळवता येते. अलीरेझाने आपल्याला या सेवेपासून सवलत मिळावी यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज मान्य झाल्याने त्याला तसं पोस्टाद्वारे कळवण्यात आलं होतं. हे उत्तर त्याच्या हाती पडण्याच्या आधी सावत्र भावाच्या हाती पडलं होतं. पत्र वाचून सावत्र भाऊ संतापला होता. अलीरेझामुळे आपल्या कुटुंबाला मान खाली घालावी लागत असल्याचं वाटत असल्याने त्याने अलीरेझाला ठार मारायचं ठरवलं होतं. अलीरेझा आणि तुर्कस्थानचा रहिवासी असलेला अघिल अब्यात यांचे प्रेमसंबंध जुळले होते. सैन्यसेवेतून सवलत मिळाल्यानंतर अलीरेझाने स्वत:चा मोबाईल विकून कायमस्वरुपी अघिलसोबत राहायला जायचं ठरवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या