समलिंगी पुरुषांना भिंतीखाली चिरडून ठार मारणार! तालिबानी न्यायाधीशाने जाहीर केली योजना

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैन्य माघारी बोलावले असून त्यांचे बहुतांश सैनिक मायदेशात पोहोचले आहेत. अमेरिकेसारख्या अतिप्रगत आणि बलाढ्य राष्ट्राचे सैनिक माघारी फिरल्याने अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा ताकदवान होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी तालिबानचे दहशतवादी प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानी राजवट आली तर तिथे शरिया कायदा लागू केला जाईल. शरिया कायदा लागू झाल्यानंतर या देशात जर कोणी समलिंगी सापडला तर त्याला भयावह मृत्यू दिला जाईल अशी धमकी तालिबानच्या न्यायाधीशाने दिली आहे.

गुल रहीम (38 वर्ष) हा तालिबानचा न्यायाधीश आहे. गुलने म्हटलंय की जर कोणी चोर सापडला तर त्याचे हातपाय कापून टाकण्यात येतील. महिलांना घराबाहेर पडण्यासाठी परवाना घेणं बंधनकारक करण्यात येईल आणि समलिंगी पुरुष सापडला तर त्याच्या अंगावर भिंत पाडून त्याला ठार मारण्यात येईल. तालिबानने मध्य अफगाणिस्तानातील काही जिल्ह्यांवर आपले राज्य प्रस्थापित केले आहे. तिथे शरिया कायदे आणि वरील शिक्षा लवकरच लागू केल्या जाणार आहेत. जर भविष्यात संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने वर्चस्व मिळवले तर संपूर्ण देशात अशा प्रकारच्या शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात.

नाटोच्या फौजा माघारी फिरल्यानंतर तालिबानने जवळपास 80 टक्के अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. यामुळे तालिबानी भलतेच आनंदात असून, गुल रहीम हा देखील त्यातलाच एक आहे. गुलने जर्मनीतील एका पत्रकाराशी बोलताना म्हटले की एका माणसाने अंगठी चोरल्याने त्याचे हात कापून टाकण्यात आले. ज्याची अंगठी होती त्याला विचारण्यात आलं होतं की चोराचे पाय कापायचे का ? यावर त्याने नकारार्थी उत्तर दिलं होतं, ज्यामुळे चोराचे फक्त हातच कापल्याचं गुल याने म्हटलंय. गुन्हा जितका गंभीर स्वरुपाचा असेल तितकी मोठी शिक्षा दिली जाते असं गुलने म्हटलंय. कमी तीव्रतेचा गुन्हा असेल तर एक बोट किंवा काही बोटे कापली जातात. गुन्हा फार गंभीर स्वरुपाचा असेल तर त्याला दगडाने ठेचून मारलं जातं, किंवा फासावर लटकावलं जातं असं गुलने सांगितलंय.

अफगाणिस्तानमधून ऑस्ट्रेलियाचीही माघार

जर्मनी, चीनसह अनेक देशांपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही अफगाणिस्तानमधून आपले सैन्य मागे घेतले आहे. हे सैन्य जवळपास 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये होते. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डट्टन यांनी सैन्यवापसीची माहिती दिली. अफगाणिस्तानातील ‘खामा प्रेस’ या वृत्तसंस्थेने ‘स्काय न्यूज’च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तालिबानच्या वाढत्या दहशतीनंतर अनेक देश अफगाणिस्तान सोडत आहेत.

अफगाणिस्तानातील आमची लष्करी मोहीम अमेरिकेच्या समन्वयाने संपुष्टात आणली आहे, असे संरक्षण मंत्री डट्टन यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इतर कुठल्याही मोहिमेत आमचा सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचे केवळ 80 सैनिक होते. त्यांना काबूल येथील दूतावासाचे रक्षण तसेच मुत्सद्दी मोहिमेसाठी नेमण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने एप्रिलमध्ये सर्व सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. या देशाने 38 हजार सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात केले होते. त्यातील 41 जवान शहीद झाले होते. हवाई सैन्यदलाने 2013 मध्ये अफगाणिस्तान सोडले होते. दरम्यान, रविवारी हिंदुस्थानने पंदहार येथून हिंदुस्थानी दूतावासातील आपल्या कर्मचाऱयांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इतर कुठल्याही मोहिमेत आमचा सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या