विहीर फोडणाऱ्या ब्लास्टिंग ट्रॅक्टरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

विहिरीसाठी ब्लास्टिंग घेणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये ठेवलेल्या जिलेटीनचा स्फोट झाल्याने एका लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या लिंगसेवाडी गावात ही घटना घडली.

लिंगसेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत ब्लाष्टींग घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील सिरसवाडी येथील एक ट्रॅक्टर आले होते. शेतात जाण्यापूर्वी गावाजवळ एका ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून चालक काही कामानिमित्त बाजूला गेला होता. त्या दरम्यान ट्रॅक्टरमध्ये ठेवलेल्या जिलेटीनचा अचानक स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की ट्रॅक्टरच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. स्फोटात डांबरी रस्त्याची खडी उडून मोठा खड्डा पडला होता. यात अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या पल्लवी भीमक लिंगसे हिला पायाची मांडी व हाताला ट्रॅक्टर मधील लोखंडी पहार लागून गंभीर मार लागला. तसेच नारायण पवार (22), विजय संतोष लिंगसे (30), ऋषि शंकर लिंगसे (10) असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत, पल्लवी व नारायण यांच्यावर तीर्थपुरी येथील एका खाजगी दवाखान्यात तर विजय व ऋषी यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.