मिथुन

2705

‘‘बुद्धिमान माणसांशी स्पर्धा करणे भूषणावह ठरते, पण निर्बुद्धाबरोबर मैत्री करणे व निष्कारण चर्चा (वाद) करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे असते.’’

आपण बुद्धिवादी आहात, आकलनशक्ती तीक्ष्ण असते, परंतु या वर्षात भलत्याच व्यक्तीबरोबर तुमचा संबंध येऊन मनस्ताप होऊ शकतो. प्रगतीची संधी प्रयत्नाने मिळवावयाची आहे. उमेद वाढविणारा कालावधी आहे. दुसऱयाच्या सांगण्यावरून निर्णय घेण्यापेक्षा स्वतः योग्य विचार करा व निर्णय घ्या. २६ जाने. २०१७ ला शनि धनु राशीत प्रवेश करीत आहे. २१ जून २०१७ ला शनि वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे. जून ते ऑक्टो. या कालावधीत तुमच्यावर आरोप येण्याची शक्यता आहे. शत्रू मैत्री करण्यासाठी येतील तेव्हा सावध राहा. २६ ऑक्टो. २०१७ ला शनि मार्गी म्हणजे धनु राशीत प्रवेश करीत आहे. १८ ऑगस्ट २०१७ ला राहू कर्क राशीत व केतु मकर राशीत प्रवेश करीत आहे. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तसाच होईल. पैसा शिल्लक राहणे कठीण आहे. जीवनसाथीसंबंधी एखादी चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही तुम्ही आत्मविश्वासाने प्रसंग निभावून नेऊ शकाल. घरासंबंधी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पैशाची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. व्यवसायात फायदा होईल, परंतु कायद्याला कमी लेखू नका. परिचित असो वा अपरिचित व्यक्तीबरोबर नोव्हे., डिसें., फेब्रु. कोणताही व्यवहार करणे त्रासदायक ठरू शकते. नोव्हें., एप्रिलमध्ये प्रवासात सावध राहा. दुखापत होऊ शकते. तणाव व वाद वाढू शकतो. कोर्टकेसच्या चक्रात अडकण्याची शक्यता आहे. राग वाढू देऊ नका. तुमचा स्वभाव मैत्री करण्याचा आहे. क्षुल्लक राजकारण खेळून चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घ्या. १२ सप्टेंबर २०१७ गुरू महाराज तुळेत प्रवेश करीत आहेत. सुसंगत या वर्षात ठेवावी व योग्य व्यक्तीचा सल्ला मोठा निर्णय घेताना घ्यावा.

राजकीय – सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती:

राजकीय – सामाजिक क्षेत्रात कोणताही निर्णय घेताना किंवा मत प्रदर्शन करताना विचार करा. परिस्थितीचे निरीक्षण व परीक्षण करा. तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न डिसें., फेब्रु.मध्ये केला जाईल. तुमच्या संशोधन कार्यात, योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न होईल. टीका होईल. आरोप येतील. अधिकार टिकवणे जास्त महत्त्वाचे ठरेल. तुम्ही बुद्धिवादी आहात. हवा येईल तशी पाठ फिरवणे कधी कधी शहाणपणाचे ठरते. ऑक्टोबर, जाने.मध्ये विरुद्धलिंगी व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलमध्ये मान-सन्मानाचा योग येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. जून, जुलैमध्ये विशेष कार्यभाग तुमच्यावर सोपवला जाईल. नोव्हें., एप्रिलमध्ये प्रवासात सावध राहा. दुखापत संभवते, ऑगस्ट, सप्टेंबर २०१७ ला उत्साहवर्धक घटना घडेल.

नोकरी-व्यवसायासंबंधी:

नोकरीत कामाची चालढकल केल्यास वरिष्ठांची नाराजी पत्करावी लागेल. दुसऱयाच्या नादाने स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. बेजबाबदार व बेफिकिरीने वागणाऱया माणसाला अडचणी येतील. जाने., फेब्रुवारीमध्ये संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. मार्च, एप्रिल व मेमध्ये प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. या वर्षात कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल. अधिक जबाबदारी स्वीकारण्यावरच मोठी कामगिरी टाकली जाते. कसोटीचा कालावधी असला तरी मे, जुलै, ऑगस्टमध्ये परदेशी नोकरी किंवा इतर घटना मनाप्रमाणे घडतील. नोव्हें, फेब्रु. व जूनमध्ये आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. फसगत संभवते. घर, वाहन, जमीन खरेदीची संधी येईल.

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी:

ऑक्टो, नोव्हें. व मार्च, एप्रिलमधील परीक्षेत मेहनत घेतल्यास चांगले यश मिळेल. मित्रांच्या संगतीने कॉलेजचे तास बंक करून मौजमजेत वेळ घालवल्यास अडचणीत याल. गैरसमज व तणाव होईल. वडीलधाऱया व्यक्तींचा सल्ला घ्या व ऐका. तुमच्या पुढील भवितव्यासाठी तेच योग्य ठरेल. जाने., मेमध्ये मैत्रीत तणाव होईल. नोव्हें., एप्रिलमध्ये वाहनापासून त्रास होईल. मारामारीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही बुद्धीने तीक्ष्ण आहात. फक्त सातत्य ठेवा म्हणजे ध्येय गाठता येईल.

महिलांसाठी:

मिळूनमिसळून राहण्याचा तुमचा स्वभाव आहे. भरपूर गप्पा मारणे तुम्हाला आवडते तसेच चांगले पदार्थ करण्यास, खाण्यास पण आवडतात. आप्तेष्ट व मित्र यांच्या मदतीला जावे लागेल. तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमच्यामागे टीकात्मक चर्चा होईल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला सावध राहावयाचे आहे. वाताचा त्रास होईल. मदत करण्याच्या नादाने स्वतःलाच मनस्ताप होऊ शकतो. ऑक्टो., डिसें. व जूनमध्ये शारीरिक व मानसिक त्रास होईल. मार्च, एप्रिलमध्ये मनावरील दडपण कमी होईल. मोठी खरेदी होईल. मौल्यवान वस्तू मात्र सांभाळा.

आपली प्रतिक्रिया द्या