‘व्हायब्रंट’ गुजरात… जनरल मोटर्स गुजरातमधील प्लांट बंद करणार

11

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

वाहन उद्योग क्षेत्रातील मोठी कंपनी ‘जनरल मोटर्स इंडिया’ने बडोदेजवळील आपला प्लांट मार्च अखेरीपर्यंत बंद करणार असल्याचे जाहीर करण्यात आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना काही दिवसांचे पैसे मिळणार असले तरी भविष्याची चिंता सतावत आहे. गुजरातमध्ये २१ वर्ष सुरू असलेला कंपनीचा प्लांट बंद करण्याच्या या निर्णयामुळे अन्य कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील धक्का लागला आहे.

गेल्या वर्षी जूनमध्येच कंपनीने घोषणा केली होती की ते मार्चपर्यंतच कंपनी सुरू ठेवतील. तोपर्यंत कंपनीतील यंत्रांची विक्री, कामगारांचे पगार, भविष्यातील पर्यायांचा विचार आणि अंमलबजावणी केली जाईल, असे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. तसेच कर्मचारी, सप्लायर्स आणि अदला-बदली संदर्भातील लोकांना वेळ मिळेल, असा विचार करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

जनरल मोटर्सने प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला असून कामगारांच्या संदर्भातील सर्व मुद्दे सोडवण्याच्या आश्वासनानंतर राज्य सरकारने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली असल्याचे सरकारचे प्रमुख सचिव जेएन सिंह यांनी सांगितले. मात्र कामगार कंपनीच्या निर्णयावर नाराज आहेत. कामगारांना पैसे मिळणार असले तरी व्यवस्थापकीय मंडळाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम कमी असल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यवस्थापकीय कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३५ ते ४० लाख रुपये आणि बाकी कामगारांना अवघे ८ ते १० लाख रुपये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. इतके पैसे मिळाले तरी वाढती महगाई, नवीन नोकरी मिळेपर्यंत असणारा तणाव जाणवत असल्याचे अनेक कामगारांनी बोलून दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या