क्षयरोग व्हेरिएंटमुळे प्रसार वाढला, टीबी रुग्णांची ‘कस्तुरबा’त होणार जिनोम सिक्वेन्सिंग

कोरोनाप्रमाणेच टीबीच्या विषाणूच्या व्हेरिएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीबी रुग्णामध्ये नेमक्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे याचा शोध घेण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत. यामुळे विषाणूच्या व्हेरिएंटनुसार सुरुवातीपासून उपचार करणे शक्य होऊन रुग्ण लवकरात लवकर टीबीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

मुंबई टीबीमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विशेष मोहीम आखून उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आज पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या नव्या उपाययोजना-उपक्रमांची माहिती दिली. पालिका रुग्णालयात येणाऱया रुग्णांमधील संशयित रुग्णांच्या चाचण्या, घरोघरी ‘आशासेविकां’च्या माध्यमातून होणारे सर्वेक्षणातून टीबी रुग्णांचा शोध घेतला जात आहे. तर सुमारे 50 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून समोर येत आहे. 2022 मध्ये मुंबईत एकूण 56 हजार रुग्ण आढळलले असून 2563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये टीबी रुग्णाचा इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तरी टीबी रुग्ण मृत्यू म्हणून नोंद असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

2025 पर्यंत मुंबई टीबीमुक्तीचे धोरण

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई 2030 पर्यंत टीबीमुक्त करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. मात्र पालिकेने 2025 पर्यंत मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रत्येक एक लाख नागरिकांमध्ये जास्तीत जास्त सर्वेक्षण करून किमान साडेतीन हजार टीबीबाधित शोधून त्यांना टीबीमुक्त होईपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत.

अशा होताहेत उपाययोजना

टीबीमुक्त झालेल्यांना ‘टीबी चॅम्पियन’ म्हणून नियुक्ती करून जनजागृती करण्यात येत आहे.

टीबी संशयित रुग्णाचे एक्स-रेच्या माध्यमातून केवळ तीन मिनिटांत निदान करता येते.

शिवडी रुग्णालयात लहान मुलांसाठी खास पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे.

प्रसारमाध्यमे, पथनाटय़, रॅली, मेळावे अशा माध्यमातून जनजागृती, निदान-उपचारासाठी प्रोत्साहन.

‘क्षयमित्र’ उपक्रमातून टीबी रुग्णांना दरमहा आर्थिक मदत, उपचारासाठी मदत, मार्गदर्शन.