अमेरिकेत उद्रेक, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बंकरमध्ये शिरले

5061

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युचे पडसाद अमेरिकेत तीव्रतेने उमटताना दिसत आहेत. अमेरिकेतील 30 शहरांमध्ये हिंसाचार उफाळला असून त्याची धग व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली आहे.

मिनिआपोलिस शहरात 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेवून बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसाला सांगतानाही दिसत आहेत. त्यानंतर जॉर्ज हे मृत झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सर्वत्र असंतोषाचं वातावरण पसरलं आणि त्याची परिणती हिंसाचारात झाली.

अमेरिकेतील काही शहरांमध्ये हा हिंसाचार उफाळला आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या हिंसाचाराची धग व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली असून रविवारी व्हाईट हाऊसजवळ आंदोलन करणाऱ्यांनी तिथल्या कचरापेटीला आग लावली आणि पोलिसांसोबत धक्काबुक्कीही केली. परिस्थिती इतकी बिघडली की संरक्षणासाठी नेमलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षित बंकरमध्ये घेऊन गेले. सुदैवाने तिथे पोहोचलेल्या वॉशिंग्टन पोलिसांनी आंदोलकांना तिथून पिटाळून लावलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव्यांना दोषी ठरवलं असून या आंदोलनाची दिशा भरकटवल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत, आणि या घटनांविषयीची खदखद या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या 44 वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या